Headlines
Home » महाराष्ट्र » भेसळखोरांना आता थेट ‘मकोका’; महाराष्ट्र सरकारचा विधान परिषदेत ऐतिहासिक निर्णय

भेसळखोरांना आता थेट ‘मकोका’; महाराष्ट्र सरकारचा विधान परिषदेत ऐतिहासिक निर्णय

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क

मुंबई: राज्यात अन्नात भेसळ करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारांचे आता धाबे दणाणणार आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ ही आता केवळ सामान्य गुन्हा न राहता ‘संघटित गुन्हेगारी’ मानली जाणार असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत केली.

कायद्याचा बडगा जामीन मिळणे होणार कठीण

आजवर भेसळखोर साध्या कायद्याचा फायदा घेऊन जामिनावर सुटत असत. मात्र, आता ‘मकोका’ लागल्यामुळे या गुन्हेगारांना सहजासहजी जामीन मिळणार नाही. शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी ही माहिती दिली.

मकोका कारवाईची वैशिष्ट्ये:

कठोर तपास: पोलीस अधीक्षकांसमोर दिलेला जबाब न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार.
जामिनासाठी अटी: या कायद्यांतर्गत अटक झाल्यास जामीन मिळणे अत्यंत कठीण असते.
कठोर शिक्षा: गुन्ह्याचे गांभीर्य पाहून जन्मठेप किंवा फाशीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद.

दूध आणि गुटखा माफियांवर सर्जिकल स्ट्राईक

वसई आणि अंधेरी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या कारवाईत दुधातील भेसळ प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल केले असून ४ जणांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय, गुटखा विक्रीलाही संघटित गुन्हेगारीच्या कक्षेत आणण्यासाठी शासन सकारात्मक असून आवश्यक कायदेदुरुस्ती विचाराधीन आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विकणाऱ्यांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे.

आतापर्यंतची आकडेवारी:

जप्त मुद्देमाल: सुमारे ₹४५० कोटी.
दाखल गुन्हे: १० हजारांहून अधिक.
नवे मनुष्यबळ: विभागात १९७ नवीन कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण, पुढील भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे.

“केवळ सणासुदीतच नाही, तर वर्षभर दूध, मसाले आणि खाद्यतेलाच्या शुद्धतेची तपासणी केली जाईल. मनुष्यबळाची कमतरता लवकरच भरून काढली जाईल, जेणेकरून अन्नसुरक्षा मोहीम अधिक तीव्र करता येईल.”
नरहरी झिरवाळ, मंत्री, अन्न व औषध प्रशासन.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!