जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या बांधकामात गेल्या काही वर्षांपासून जाणूनबुजून मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. या विलंबामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था प्रचंड कोलमडली असून, लहान मोठ्या अपघातांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. विशेषतः अग्रवाल हॉस्पिटल आणि एकलव्य क्रीडा संकुल ( एम.जे. कॉलेज कॅम्पस ) जवळील रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. आज झालेल्या अपघातात एका महिलेस जबर दखापत झाली. खड्डे, असमान पृष्ठभाग आणि अपुरी देखभाल यामुळे दररोज अनेक अपघात घडत असून, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि संघटनांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागण्या केल्या आहेत, पण अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूने समांतर सेवा रस्ते (सर्व्हिस रोड्स) बांधण्याचे काम २०१८ मध्येच प्रस्तावित झाले होते. परंतू गेल्या सात वर्षांत हे काम बऱ्याच ठिकाणी अर्धवटच राहिले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे कामास सुरवात देखील झालेली नाही अशीही चर्चा नागरिकांत आहे .

विशेषतः अग्रवाल हॉस्पिटल आणि एकलव्य क्रीडा संकुलाजवळील भागात रस्स्ता खूपच खराब झाला आहे. हे क्षेत्र एम.जे. कॉलेज रोडवर असून, येथे महामार्गाला जोडणारा रस्ता खड्डेमय आहे. परिसरात असलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांमुळे सदर ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. विद्यार्थ्यांना खराब रस्त्यारून ये जा करतांना तारेवरची कसरत करावी लागते. एकलव्य क्रीडा संकुल एम.जे. कॉलेज कॅम्पसमध्ये आहे, जेथे रोज शेकडो विद्यार्थी आणि खेळाडू येतात. संकुलाच्या गेट समोरच रस्ता खोदून मागील काही दिवसापासून खडी टाकून रस्त्याचे काम कासव गतीने सुरु आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावर सर्वत्र खडी पसरत असल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार नेहमीच घडतात. आज दि.१ डिसेंबर दुपारी १ वाजेच्या सुमारास एक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका महिलेच्या डाव्या हाताला तसेच गुडघ्याला जबर दुखापत झाली. या अपघातामुळे रस्त्यावर काहीवेळ बघ्यांची तसेच वाहनांची मोठी गर्दी जमा झाली.
दरम्यान जवळच असलेल्या भास्कर मार्केट तसेच रिंगरोड परिसरात अनेक हॉस्पिटल असल्याने रुग्णवाहिकांना जाणेही कठीण होते. नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या मात्र प्रशासनाच्या भूमिकेबद्दल जळगावकर देखील आश्चर्य व्यक्त करून शासन प्रशासनाला लोकांच्या जीवाची पर्वा नाही म्हणत शिव्या शापांची बरसात करतात. दिवसभरात तीन -चार अपघात या स्पॉटवर होतात. यामुळे एकलव्य क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने या प्रकल्पाला प्राधान्य देऊन काम लवकर पूर्ण करण्याची गरज आहे, अन्यथा अपघातांची मालिका थांबणार नाही. नागरिकांच्या बळी जाण्याची वाट न बघता दादा, भाऊ, मामा, आप्प्पा यांच्या आशीर्वादाने, समांतर रस्त्याच्या कामात अडथळा होत असलेले सर्व अतिक्रमण कायमस्वरूपी काढून समांतर रस्त्याच्या कामाची गती वाढवावी अन्यथा जळगाव शहरातील ही ‘मृत्यूची पट्टी’ लोकांचा जीव घेईल यात शंका नाही.

