पाचोरा | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा शहरात जारगाव चौफुलीवर जळगावकडे जातांना ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात तीन जण जखमी झाले असुन एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. अपघातातील ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील गिरड येथील रहिवासी शेख इस्माईल अब्दुल नबी मणियार हे त्यांच्या पत्नी सना शेख इस्माईल मणियार (वय २६ वर्ष) यांची प्रकृती ठीक नसल्याने पाचोऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन येत होते. ते गिरड येथून सकाळी मोटरसायकलवरून निघाले होते. दरम्यान जारगाव येथे रस्त्यावर वाढते अतिक्रमण तसेच बेशीस्त वाहतुक यामधुन शेख इस्माईल मणियार हे जात असताना रस्त्यावरच रिव्हर्स येणाऱ्या एका ट्रकच्या चाकाखाली सना शेख इस्माईल मणियार ह्या सापडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर शेख इस्माईल मणियार, त्यांच्या आई शानुरबी अब्दुलनबी मणियार आणि महिरा शेख इस्माईल मणियार ( वय ४ वर्ष ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाचोरा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, इरफान मणियार, लतीफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अझरखान, हे तातडीने घटनास्थळी येऊन मयत सना शेख इस्माईल मणियार व जखमींना पाचोरा येथील रुग्णालयात दाखल केले. या दुर्दैवी घटनेने मणियार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
