New responsibility for Sanjay Singh : राज्यसभा खासदार संजय सिंह यांची संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सचिव पंकज कुमार गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांची संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ‘आप’ने संजय सिंह यांच्यावर संसदेतील ‘आप’ संसदीय पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील पक्षाचे नेते अशी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी मिळाल्याबद्दल संजय सिंह यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहेत. आम आदमी पक्षाने लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून याबाबत अधिकृत माहिती दिली होती.
खासदार संजय सिंह यांनी नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर ट्विट करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहेत.
त्यांनी लिहिले आहे की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मला नेहमी रस्त्यावरून सभागृहापर्यंत आवाज उठवण्याची संधी दिली. पक्षाच्या संसदीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून अरविंद केजरीवाल यांनी दिलेली जबाबदारी मी पूर्ण समर्पणाने पार पाडीन. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी “अत्यंत आभारी आहे.”
याआधीही राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात पक्षाचे नेते म्हणून जबाबदारी पार पाडली होती. राज्यसभेवर दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार संजय सिंह यांनी १९ मार्च रोजी वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सध्या १० खासदारांसह आम आदमी पक्ष राज्यसभेतील चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्याचबरोबर लोकसभेत यावेळी ३ खासदार निवडून आले आहेत.
संजय सिंह हे २०१८ मध्ये पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार बनल्यानंतर ‘आप’च्या खासदाराने अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. गेल्या कार्यकाळात त्यांना निलंबितही करण्यात आले होते.
