जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘लोकांचे तत्परतेने केलेले काम व त्यांचे समाधान हीच चांगल्या प्रशासनाची खरी सेवा’ या ब्रिद वाक्याचा अर्थ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसतो तो रावेर तालुक्यातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या कामगिरीत. तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत “माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी” हा एकच ध्यास मनाशी बाळगून त्यांनी आपली कारकीर्द जगली. सरकारी कार्यालये म्हणजे फक्त फाईली, शिक्के आणि तारखा अशी लोकांची समजूत असते. पण संजय तायडे यांनी तहसील कार्यालयाला माणुसकीचे रूप दिले. त्यांच्या टेबलापाशी आलेला प्रत्येक नागरिक… मग तो गरीब असो…अशिक्षित असो किंवा अडचणीत असलेला असो…त्याला “आपले काम होईल” हा विश्वास मिळाला.

जळगाव जिल्ह्यातील यावल, भुसावळ आणि रावेर या तीन तालुक्यांतील तहसील कार्यालयात त्यांनी पुरवठा विभाग, निवडणूक विभाग, संजय गांधी निराधार योजना तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून हजारो गोरगरीब कुटुंबांना आधार दिला. कागदोपत्री अडकलेली अनुदाने, रखडलेली मदत, आणि दुर्लक्षित प्रकरणे — या सगळ्यांना त्यांनी संवेदनशीलतेने हात घातला. अनेकांच्या घरात चूल पेटली, अनेकांच्या डोळ्यातील चिंता कमी झाली, आणि अनेकांना शासन आपले आहे याची जाणीव झाली.
त्यांची काम करण्याची शैली साधी पण परिणामकारक. आवाज न करता काम करणे, श्रेय न मागता जबाबदारी पार पाडणे आणि प्रत्येक निर्णयात सामान्य माणसाचा विचार करणे… हेच त्यांचे प्रशासनाचे सूत्र. निवडणुकीसारख्या संवेदनशील प्रक्रियेतही त्यांनी पारदर्शकता, शिस्त आणि विश्वास टिकवून ठेवला.
आज प्रशासनात कामगिरीपेक्षा आकडे महत्त्वाचे मानले जातात, पण संजय तायडे यांची खरी कामगिरी आकड्यांत नाही, तर लोकांच्या समाधानात आहे. एखाद्या वृद्ध महिलेच्या डोळ्यातील कृतज्ञतेचा भाव, एखाद्या निराधार कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे हसू, आणि एखाद्या नागरिकाच्या मनात निर्माण झालेला विश्वास— हीच त्यांच्या तीस वर्षांच्या सेवेची खरी पावती आहे.
संजय तायडे यांच्यासारखे अधिकारी म्हणजे प्रशासनाची ताकद. कारण त्यांनी दाखवून दिले आहे की, लोकांचे काम तत्परतेने करणे आणि त्यांचे समाधान जपणे– हाच खरा चांगल्या प्रशासनाचा कस आहे.
✍️ वास्तव पोस्ट, संपादक
दिपक जाधव, जळगाव

