नवी दिल्ली | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– चित्रपट अभिनेत्री जया प्रदा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आणि भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने जयाप्रदा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द करण्याची मागणी करणारी याचिका जया यांनी हायकोर्टात दाखल केली होती. २७ फेब्रुवारी रोजी याचिका मागे घेऊन पुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली होती, ती उच्च न्यायालयाने निराधार मानून फेटाळली.
रामपूरच्या जिल्हा न्यायालयाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटविरुद्ध जयाप्रदा यांनी याचिका दाखल केल्या होत्या. न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान जयाप्रदा यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना काही नवीन तथ्ये आणि नवीन कागदपत्रांसह नवीन अर्ज दाखल करायचा आहे. या आधारे दोन्ही याचिका मागे घेण्यासाठी वकिलांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली. न्यायालयाने जयाप्रदा यांच्या वकिलांची विनंती मान्य करत याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. माघारीचे कारण देत न्यायालयाने अर्ज फेटाळून लावले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जयाप्रदा यांच्यावर हे दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही प्रकरणे आचारसंहिता भंगाशी संबंधित आहेत. रामपूरच्या जिल्हा न्यायालयातून समन्स बजावण्यात आले असूनही जयाप्रदा न्यायालयात हजर झाल्या नाहीत. रामपूरच्या जिल्हा न्यायालयात जयाप्रदा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते, अनेक वेळा जारी करूनही न्यायालयात हजर न राहील्याने त्यांना हे वारंट काढण्यात आले आहे.
