जळगाव दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जळगाव महानगराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आज रविवार, ११ रोजी सायंकाळी ६ वाजता पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिज्ञा घेऊन या महोत्सवाला सुरूवात होईल आणि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केल्यानंतर समारोप होणार असल्याची माहिती कुलभुषण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या २३ वर्षांप्रमाणे यावर्षी देखील सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात येत असुन शिवराज्यभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाले असल्याने या वेळी जयंती उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल. दरवर्षी सर्व जाती, धर्म, समूह, विविध विचार प्रवाहातील लोकांना सोबत घेऊन जयंती साजरी करणे हे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
या महोत्सवा दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन त्यात दि.१५ फेब्रुवारी रोजी किल्ले बनवा स्पर्धा आहे , याकरीता लागणारे साहित्य समितीतर्फे दिले जाणार असुन विजेत्यास आकर्षक बक्षिसे व सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे प्रमुख पुरुषोत्तम चौधरी असतील. स्पर्धेत बनविलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन व यासोबतच महेश पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले आरमार प्रदर्शन दि. १६, १७ व १८ फेब्रुवारी असे तीन दिवस हे भाऊंचे उद्यानासमोर, काव्य रत्नावली चौक येथे सर्वांसाठी खुले असणार आहे. १७ रोजी पिंप्राळा येथे कीर्तन, १८ रोजी जैन उद्योग समूह व कलाध्यापकांच्या सहकार्याने शालेय स्तरावरील मुलांसाठी चित्र रंगभरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा असेल. तसेच १८ रोजी संध्याकाळी ४ वाजता महिलांची मोटरसायकल रॅली निघणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले . दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सकाळी आठ वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेत ट्रैक्टरवर सजीव आरास, देखावे हे वैशिष्ट्य असणार आहे .१९ तारखेला संध्याकाळी ४ वाजता पिंप्राळा येथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक व सजीव देखाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे .६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केल्यानंतर समारोप होणार आहे असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले .
समितीची रचना व सदस्य :
कुलभूषण पाटील (अध्यक्ष), एजाज मलीक, नंदू आडवाणी व रजनीकांत कोठारी (उपाध्यक्ष), जयश्री महाजन (कार्याध्यक्ष), राम पवार (सचिव), खुशाल चव्हाण (खजिनदार), सुकाणू समितीत प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, मुरलीधर महाजन, चंदन कोल्हे, रवींद्र भावसार, कल्पेश सोनवणे, संग्रामसिंह राजपूत व अश्विनी देशमुख यांचा समावेश आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर व उद्योजक अशोक जैन मार्गदर्शक आहेत.
