Home » महाराष्ट्र » मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७६ वा वर्धापन दिन संपन्न : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७६ वा वर्धापन दिन संपन्न : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड ( वास्तव पोस्ट ) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज दि.१७ रोजी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी मराठवाडा मुक्तिदिन समारंभात माता गुजरीजी विसावा उद्यान येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मंत्री महाजन व मान्यवरांच्या हस्ते मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जनतेला संबोधित केले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याच्या गौरवशाली इतिहासाला यावेळी त्यांनी उजाळा दिला. स्वातंत्र्य सैनिकांचा लढाऊ बाणा आमच्यासाठी प्रेरणादायी असून नांदेडसह मराठवाड्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याचबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभामंडपात असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली.

यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत व मराठवाडा गीत सादर केले. यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, रेल्वेच्या विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक निती सरकार व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी आणि अक्षय ढोके यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!