डोंबिवली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पूर्वेतील एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत जवळचे शो रूम जळून खाक झाले. हा स्फोट इतका भीषण होता की भूकंपासारखे हादरे बसून जवळजवळ ४ किलोमीटर परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. हवेत धुराचे लोळ लांबवरून दिसत होते. तसेच बॉयलरच्या स्फोटाचा आवाज ४ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. या कंपनीच्या जवळ असलेले हुदांई गाड्यांचे शोरूम देखील जळून खाक झाले आहे.
दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर नजीकच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले आहेत.
डोंबिवली आगीच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. ८ जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.
