Best Agricultural State : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात कृषी विषयक क्रांतिकारी पावले उचलली आहेत. त्यांच्या या पावलांमुळेच हा प्रतिष्ठेच्या मानांकित पुरस्कारावर महाराष्ट्राचे नाव कोरले गेल्याचे पटेल यांनी नमूद केले आहे.
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.
हा पुरस्कार १० जुलै रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १५ व्या कृषी नेतृत्व संमेलनात प्रदान केला जाईल. या संमेलनात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान तसेच ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँडचे राजदूत, महाराष्ट्र, यूपी, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड या राज्याचे मंत्रीगण व इतर मान्यवर सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळणे प्रतिष्ठेचे अत्यंत समाधानाचे असल्याचे नमूद करून पटेल म्हणाले की, युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी तापमान वाढीचे युग संपले आहे. आता होरपळीचे युग सुरु झाले आहे. आता तातडीच्या प्रयत्नांची गरज आहे, अशी जगातील कारभाऱ्यांना हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देणारे आणि त्यावर गांभीर्याने पावले उचलणारे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले नेतृत्व आहे. गुट्रेस यांनी दगडी कोळसा जाळणे थांबवा आणि वृक्षारोपणाची गती वाढवा, असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने आता २१ लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर दगडी कोळसा जाळणे कमी व्हावे, यासाठी कोळशा ऐवजी ५ टक्के बायोमास वापरण्याचा निर्देश देणारे एकनाथ शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. गुट्रेस यांचा मानव जात वाचवण्याच्या हाकेला संवेदनशीलतेने प्रतिसाद देणाऱ्या त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे यांची या पुरस्कारासाठी दखल घेतली गेली आहे. जगात नव्हे, किमान देशात तरी अशी क्रांतिकारी पावले उचलणारे खरोखरच आपल्या मुख्यमंत्री पदासोबतच पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे निर्णय घेणारे श्री. शिंदे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक परिवर्तनकारी निर्णय घेतले आहेत. यात देशातील सर्वात मोठे बांबू मिशन, जमिनीमध्ये केंद्र आणि राज्य मिळून हरित पट्टा निर्माण करणे, १७ लाख हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करणे, भारतातील पहिले मायक्रो मिलेट क्लस्टर लातुर येथे, पीएम किसान सन्मान निधी दुप्पट, याशिवाय लाखो शेतकऱ्यांना नॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरण, तृणधान्य अभियानात श्री अन्न म्हणून सावा, राळा-भुरका यांसह विविध तृणधान्यांना प्राधान्य, राज्यांच्या रब्बी पिकांच्या हमी भावाच्या शिफारशी करीता महत्वाची भूमिका, तसेच अन्न सुरक्षा आणि पर्यावरणाची काळजी या दोन्ही आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार काम करत आहे. त्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री शदेवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार कारणीभूत आहे.
अलिकडेच औष्णिक वीज केंद्रांनी बायोमासमध्ये बांबूचाही वापर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. यासाठी राज्यातील बांबू लागवडीचे मिशनही उपयुक्त ठरणार आहे. बांबू लागवडीसाठी हेक्टरी ७ लाख रुपायांचे अनुदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शिर्डी आणि मुंबईसह शक्य त्या सर्वच विमानतळांच्या ठिकाणी कार्बन फुटप्रिंट कमी करण्याकरिता पोलाद आणि अन्य धातूंऐवजी बांबूचा वापर करण्यावर भर देण्याचेही राज्य सरकारने धोरण आखले आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. या तिघांचेही आणि महाराष्ट्राच्या या प्रयत्नांची दखल घेऊन, पुरस्कार दिल्याबद्दल डॉ. खान यांचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पटेल यांनी आभार मानले आहेत.
