जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव पासून ३५ किलोमीटर अंतरावर परधाडे ते माहेजी या रेल्वे स्थानका दरम्यान भीषण दुर्घटना घडली असून यात ११ रेल्वे प्रवासी मृत तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. यात जखमींची अवस्था बघता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनूसार आज बुधवार दि २२ रोजी संध्याकाळी ५ वाजता अचानक पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याचे समजल्याने रेल्वेच्या एका बोगीतील काही प्रवाशांनी भीतीपोटी ट्रेनमधून उड्या मारल्या. याचवेळी बाजुच्या रुळावरून कर्नाटक एक्सप्रेस आल्याने काही प्रवासी त्याखाली चिरडले गेले. यात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान पुष्पक एक्स्प्रेस लखनौहून मुंबईकडे जात असताना जळगाव पासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या परधाडे ते माहिजी रेल्वे स्थानकादरम्यान हा मोठा अपघात झाला. तर चिरडणारी कर्नाटक एक्स्प्रेस बेंगळुरू हून दिल्लीकडे जात होती.
■ मृतांच्या कुटुंबीयाना ५-५ लाख मदत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल सांगितले की, पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याचा समज झाल्याने बोगितुन काही प्रवाशांनी खाली उड्या मारल्या, याचवेळी बाजुच्या ट्रैक वरुन कर्नाटक एक्सप्रेस आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
■ केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी व्यक्त केल्या संवेदना :
गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या X या हैंडल वर या घटनेबाबत खेद व्यक्त करताना म्हटले की, महाराष्ट्रातील जळगाव येथे घडलेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. स्थानिक प्रशासन जखमींना शक्य ती सर्व मदत पोहोचवीत आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत अशी कामना करतो.
■ अलार्म चैन पुलिंगची झाल्याची सेंट्रल रेल्वे कडून माहिती :
पुष्पक एक्सप्रेस मध्ये अलार्म चैन पुलिंग झाल्याने गाडी थांबली होती. या दरम्यान एका बोगितिल काही प्रवासी खाली उतरले होते, याचवेळी दुसऱ्या दिशेने कर्नाटक एक्सप्रेस आल्याने ही दुर्घटना झाल्याचे सेंट्रल रेल्वे चे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्थानिक डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, प्रशासन अधिकाऱ्यांशी समन्वय साधून घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असून भुसावळ येथून अपघात निवारण ट्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. तसेच मध्य रेल्वे जखमी प्रवाशांना वैद्यकीय मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
◆ रेल्वे मंत्र्यांची प्रतिक्रिया :
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि इतर अधिकाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणतात, “…काही प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमध्ये अलार्म चेन ओढली आणि ट्रेनमधून खाली उतरले. बेंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस दुसऱ्या बाजूने येत होती. त्यात काही प्रवाशांना धडक बसल्याने गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे… अनेक लोक भुसावळहून ट्रेनमध्ये चढले होते आणि त्यापैकी एकाने अलार्म चेन ओढली. त्यानंतर, ते ट्रेनमधून खाली उतरले आणि चुकीच्या पद्धतीने ट्रेन ओलांडण्याचा प्रयत्न केला किंवा रुळांवर उभे होते. यामुळे त्यांना ट्रेनने धडक दिली. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक घटनास्थळी रवाना झाले आहेत, वैद्यकीय पथक तेथे आहे, स्थानिक प्रशासन देखील तेथे आहे. रेल्वेचे वरिष्ठ विभाग अभियंता देखील तेथे आहेत. इतर वरिष्ठ डॉक्टर आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
