धाराशिव | दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक ठिकाणी जागावाटपावरून तिढा निर्माण झालेला आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या तसेच विरोधकांची राजकीय खेळी बघता कोणत्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे यावरून सर्वच पक्षांची तारेवरची कसरत सुरू आहे. काहीठिकाणी उमेदवारांची घोषणा जरी झालेली असली तरी ऐनवेळी उमेदवार बदलतो की काय, अशी शक्यता देखील नाकारता येत नाही.
त्यात जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र सर्वत्र झाले आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
धाराशिव मतदारसंघामध्ये मराठा समाजाकडून १ हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. प्रत्येक गावातून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या अनामत रकमेसाठी प्रत्येक मराठा कुटुंबाकडून १०० रुपये देणगी दिली जाणार आहे. त्यामुळे धाराशिवमधील लोकसभेची निवडणूक प्रशासनासाठीच आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ५० जणांची उमेदवारी निश्चितही करण्यात आली असुन याबाबत २४ मार्चला अंतरवाली सराटीत बैठक होईल. त्यात उमेदवारांबाबत पुढील दिशा ठरवली जाईल. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास प्रशासनाची डोकेदुखी वाढणार एवढे मात्र निश्चित आहे.
