Headlines
Home » जळगाव » देशाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : डॉ. उदय निरगुडकर

देशाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : डॉ. उदय निरगुडकर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर इच्छाशक्ती, अविरत मेहनत, सांघिक प्रयत्न, त्याग आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयात ‘रोजगार कक्ष’ विभागाच्या वतीने ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ, प्रसिद्ध वक्ते व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर, मुंबई यांचे ‘आजचा तरुण आणि भविष्यातील संधी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. आपल्याला माणूस म्हणून आणि राष्ट्र म्हणून प्रगती साधायची असेल तर नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची इच्छाशक्ती आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

या व्याख्यान प्रसंगी त्यांनी, देश-विदेशातील भ्रमंतीमध्ये त्यांना आलेले अनुभव व आठवणी सांगत वेगवेगळ्या देशातील संस्कृतीचे वेगळेपण लक्षात आणून दिले. विद्यार्थ्यांनी आयुष्याकडे कसे पहावे, कसा विचार करावा, काळानुरूप बदलती जीवनपद्धती, त्यातील गुंतागुंत, त्यातून मार्ग काढत गाठलेली उंची, खुणावणाऱ्या भविष्यातील आशा, संधी, त्यासाठीचे प्रयत्न, त्याच्या दिशा आणि मिळणारी यशस्वीता याविषयी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर रहावे. स्वयंशिस्त बाळगावी. संशोधन क्षेत्रात यावे. वेळ वाया न घालवता वेळेचा सदुपयोग करावा. सोशल मीडिया, टेक्नॉलॉजीचा सकारात्मक पद्धतीने वापर करावा. अपयश आल्यानंतर खचून न जाता पुढे आपला प्रवास कसा करावा हे आजच्या समाजातील यशस्वीतांची काही वास्तव उदाहरणे देत सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.सं.ना.भारंबे हे होते. यावेळी प्रास्ताविकपर मनोगतात त्यांनी कोविड-१९ नंतर विद्यार्थ्यांच्या जीवनपद्धतीत झालेले बदल व त्यांच्यात आलेली उदासीनता यावर भाष्य करीत अशा व्याख्यानांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ.अखिलेश शर्मा यांनी केलेल्या देवीच्या स्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर रसिका ढेपे या विद्यार्थिनीने ‘तू तेज दे तू बुद्धी दे’ हे प्रार्थनागीत म्हणून अतिथींचे स्वागत केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.योगेश महाले यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.वर्षा उपाध्ये यांनी केले. यावेळी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.देवेंद्र इंगळे, कला शाखेचे अधिष्ठाता प्रा.भूपेंद्र केसुर, केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, मराठी विभाग प्रमुख प्रा.विद्या पाटील, ‘रोजगार कक्ष’ विभागाचे समन्वयक डॉ.मारोती देशट्टीवार व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!