Home » क्रीडा » जळगाव क्रिकेट लीगचा थरार: अमळनेर, रावेर आणि चाळीसगाव संघांचे जोरदार विजय

जळगाव क्रिकेट लीगचा थरार: अमळनेर, रावेर आणि चाळीसगाव संघांचे जोरदार विजय

उपांत्य फेरीसाठी चुरस वाढली; साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यांकडे लक्ष

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) मध्ये आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. २१ आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यांमध्ये अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स या संघांनी आपापले सामने जिंकून स्पर्धेतील चुरस कायम ठेवली आहे.

अमळनेर सुहांस जायंट्सचा दणदणीत विजय

अमळनेर सुहांस जायंट्स आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. चाळीसगावने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमळनेरच्या सलामीवीरांनी ४९ धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात केली. यामध्ये मानव टिबरेवाल (३९ धावा) आणि ऋषी यादव (१० धावा) यांचे योगदान राहिले. मधल्या फळीत अजय पाटीलने २७ चेंडूत ३४ धावांची फटकेबाजी केली, तर सतीश चतुर्वेदीने ११ चेंडूत २० धावा जोडल्या. अमळनेरने २० षटकांत ८ बाद १४७ धावांचे लक्ष्य ठेवले. चाळीसगावकडून ओम मुंडेने १३ धावांत ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात अमळनेरच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर चाळीसगावचा संघ १६.३ षटकांत केवळ ८४ धावांवर गारद झाला. मोहम्मद सैफला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी (३ बळी) सामनावीर घोषित करण्यात आले.

रावेर रॉयल्सचा पहिला विजय

विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रावेर रॉयल्सने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ७ धावांनी मात करत पहिला विजय नोंदवला. रावेरने प्रथम फलंदाजी करत १३० धावा केल्या. यात यश नहार (३१), मोहम्मद नमीन (२७), प्रज्वल राजपूत (२२), तुषार चोरडिया (२०) आणि धवल हेमानी (१२) यांनी धावा केल्या. पाचोराकडून कैलास पांडे आणि विरेन पाटील यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. १३१ धावांचा पाठलाग करताना पाचोराचा संघ १९.३ षटकांत १२३ धावांवर बाद झाला. आर्यन देशमुख (२४), सिद्धेश देशमुख (२२) आणि विरेंद्र पाटील (२०) यांची झुंज अपयशी ठरली. रावेरकडून यश नहार आणि मोहम्मद नोमान यांनी ३-३ बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या यश नहारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरची पाचोऱ्यावर मात

२१ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चाळीसगाव संघाने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ६ गडी राखून सहज विजय मिळवला. पाचोरा संघाने प्रथम फलंदाजी करताना १०५ धावा केल्या. यात वीरेन पाटील (२९) आणि रोहित तलरेजा (२५) यांचे मुख्य योगदान राहिले. चाळीसगावकडून अभी पाटीलने ३ तर प्रणव जाधव आणि कोळी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. १०६ धावांचे लक्ष्य चाळीसगावने केवळ १३.५ षटकांत गाठले. प्रशांत डोळे (३७), साहिल गायकर (२९) आणि कर्णधार ओम मुंडे (२४) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली.

आज ठरणार क्वालिफायर

साखळी फेरीचे आता दोन सामने शिल्लक असून २३ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यांवरून क्वालिफायर संघ स्पष्ट होतील. सध्या गुणतालिकेत जामनेर आणि जळगाव संघ ६ गुणांसह आघाडीवर आहेत.
आजचे सामने (२३ एप्रिल):

  • दुपारी ३:०० वा: रावेर रॉयल्स विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स
  • सायंकाळी ७:३० वा: पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध अमळनेर सुहांस जायंट्स

सद्यस्थिती गुणतालिका:

संघसामनेविजयीपराभूतगुण
जामनेर सातपुडा हिरोज
जळगाव कोगटा किंग
अमळनेर सुहांस जायंट्स
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स
पाचोरा एसकेटी योद्धाज
रावेर रॉयल्स

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!