Headlines
Home » क्रीडा » टीम इंडियाने आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली

टीम इंडियाने आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली

जोहान्सबर्ग ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या चौथ्या टी २० सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. भारतीय फलंदाजांनी आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करत २० षटक अखेर २८३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा बचाव करताना भारताच्या गोलंदाजीतही आक्रमकता पाहायला मिळाली. यासह भारताने हा सामना १३५ धावांनी आपल्या नावावर केला. यासह टी-२० मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २८४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. सलामीला आलेल्या हेंड्रिक्सला अर्शदीप सिंगने शून्यावर क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. त्यानंतर हार्दिक पंड्याने रिकलटनला बाद केले. तो फक्त एकच धाव काढू शकला. आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम ८ तर क्लासेन आल्यापावली शून्यावर तंबूत परतला.

दक्षिण आफ्रिकेचे ४फलंदाज १० धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले होते, मात्र यानंतर डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी ५४ चेंडूत ८६ धावांची भागीदारी झाली. डेव्हिड मिलर २७ चेंडूत ३६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर ट्रिस्टन स्टब्सने २९ चेंडूत ४३ धावांचे योगदान दिले. मार्को जॅनसेन १२ चेंडूत २९ धावांवर नाबाद राहीला.

अर्शदीपने सुरुवातीलाच ३ गडी बाद केले. भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या, रवी बिश्नोई आणि रमनदीप सिंगने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. तर अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

त्याआधी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी वादळी खेळी केली. अभिषेक शर्माने ताबडतोड सुरुवात करून देत १८ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या.

अभिषेक बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांचे रौद्र रूप पाहायला मिळालं. आफ्रिकन गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत चौकार षटकारांची आतिषबाजी केली. भारतीय फलंदाजांनी या डावात २३ षटकार आणि १७ चौकार खेचत निर्धारित २० षटकांत १ गडी गमावून २८३ धावा केल्या.

संजू सॅमसनने ५६ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांचा मदतीने १०९ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ४७ चेंडूत ९ चौकार आणि १० षटकांरांच्या मदतीने नाबाद १२० धावांची खेळी केली. दोघांनी मिळून २१० धावांची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!