दुबई ( वास्तव पोस्ट ) : येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने चार गडी राखत दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. आजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते.
डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांच्या अर्ध शतकीय खेळीच्या जोरावर ७ गडी गमावून न्यूझीलंड संघाने २५१ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक ६३ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर जाडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
न्यूझीलंडकडून विल यंग २३ चेंडूत १५ धावा केल्या, फॉर्ममध्ये असणारा रचीन रविद्र २९ चेंडूत ३७ धावा तर केन विल्यमसनही फक्त ११ धावा करू शकला. टॉम लॅथमने १४, ग्लेन फिलिप्सने ३४ धावा, डॅरिल मिशेलने ६३ धावांचे योगदान दिले. मोहम्मद शमीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर याने ८, मायकेल ब्रेसवेल हा ४० चेंडूत ५३ धावा करून नाबाद राहीला.

रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी
भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने मोठी भूमिका बजावली. त्याने ८३ चेंडूंत ८३ धावांचा सामना केला आणि ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची शानदार खेळी केली. भारताकडून शुभमन गिलने ३१, श्रेयस अय्यरने ४८, अक्षर पटेलने २९, हार्दिक पंड्या १८ आणि केएल राहुलने नाबाद ३४ धावा केल्या. आज विराट कोहलीने निराशा केली. तो केवळ १ धावांवर पायचित बाद झाला. शेवटी रविंद्र जाडेजा ने विजयी चौकार खेचत ९ धावांवर नाबाद परतला.
२५ वर्षांनंतर भारताने न्यूझीलंडकडून घेतला बदला !
चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून, भारताने २५ वर्षांनंतर न्यूझीलंडकडून बदला घेतला. २५ वर्षांपूर्वी २००० मध्ये, न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा ४ गडी राखून पराभव केला होता.
भारताने शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. १२ वर्षांनंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
■ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आतापर्यंतच्या विजेत्यांची आणि उपविजेत्यांची यादी
| वर्ष | यजमान देश | विजेता | उपविजेता |
| २०२५ | पाकिस्तान | भारत | न्यूझीलंड |
| २०१७ | इंग्लंड आणि वेल्स | पाकिस्तान | भारत |
| २०१३ | इंग्लंड आणि वेल्स | भारत | इंग्लंड |
| २००९ | दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | न्यूझीलंड |
| २००६ | भारत | ऑस्ट्रेलिया | वेस्ट इंडीज |
| २००४ | इंग्लंड | वेस्ट इंडीज | इंग्लंड |
| २००२ | श्रीलंका | भारत आणि श्रीलंका (संयुक्त विजेते) | , |
| २००० | केनिया | न्यूझीलंड | भारत |
| १९९८ | बांगलादेश | दक्षिण आफ्रिका | वेस्ट इंडीज |
