Home » क्रीडा » T-20 वर्ल्ड कप : भारत आणि पाकिस्तान संघात आज रंगणार ‘हाय व्होल्टेज’ सामना

T-20 वर्ल्ड कप : भारत आणि पाकिस्तान संघात आज रंगणार ‘हाय व्होल्टेज’ सामना

T-20 World Cup 2024 : भारत – पाकिस्तान यांच्यात आज रात्री न्यूयॉर्क मध्ये हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड बघता भारत वरचढ आहे.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना आज रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्यास सुरवात होईल. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. आजचा हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर बाबर आझम पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण बारा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले असुन, त्यात भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. भारतीय संघानं १२ पैकी ९ सामने जिंकले आहेत. तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या पाच सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रदर्शन वरचढ राहिले आहे. टीम इंडिया मागील ५ पैकी ३ सामन्यात विजयी झाले आहेत. तर पाकिस्तानला फक्त २ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, तसेच हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगीरीवर भारतीयांच्या नजरा असतील. कर्णधार रोहितने आयर्लंडविरुद्ध ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. उसळता चेंडू खांद्यावर लागल्याने त्याला माघारी परतावे लागले होते.

अमेरिका संघाकडून सुपर ओव्हरमध्ये पराभूत झालेल्या पाकिस्तान संघावर मात्र दबाव असणार आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद आमिर यांच्या कामगीरीवर पाकची मदार असेल. यूएसकेविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाला होता. बाबरनं मागच्या सामन्यात ४४ धावांची खेळी केली होती. मात्र मोहम्मद रिझवान फ्लॉप ठरला. शाहीन आफ्रिदीला गोलंदाजीत एकही विकेट मिळाली नाही. तर मोहम्मद आमिरला एकच विकेट घेता आली. गेल्या सामन्यात या खेळाडूंची कामगिरी पाहिजे तशी झाली नसली तरी भारता विरुद्धच्या सामन्यात आपला खेळ उंचावण्याचा या सर्वांचा प्रयत्न असेल.

नासाऊ मैदानावरील खेळपट्टीमुळे काही खेळाडूंनी आपली नाराजगी व्यक्त केली आहे. चेंडूला मिळणाऱ्या अनियमित उसळीमुळे खेळाडूंना दुखापत झाली आहे. तसेच पावसामुळे या सामन्यात व्यत्यय येऊ शकतो आणि सामन्याची मजा ही खराब होऊ शकते. AccuWeather नुसार, ४१ टक्के पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणून आता या सामन्यात खेळपट्टीसोबतच हवामानही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!