मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुशीर खानचे शतक व अजिंक्य रहाणे, शम्स मुलाणी व श्रेयस अय्यरची तुफानी अर्धशतके यांच्या जोरावर यजमान मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद ४१८ धावा केल्या. आता विदर्भसमोर विजयासाठी ५३८ धावा करण्याचे आव्हान असून सामन्याचे दोन दिवस अद्याप बाकी आहेत. मुंबई विक्रमी विजेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे हे जवळपास निश्चित झाले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भाची बिनबाद १० अशी सुरवात आहे, ध्रुव शौरी ७ तर अथर्व तायडे ३ धावांवर खेळत आहेत.
मुशिरने मोडला सचिनचा २९ वर्षा पूर्वीचा विक्रम

मुशीर खान हा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज बनला आहे. त्याने महान सचिन तेंडुलकरचा २९ वर्षांचा विक्रम मोडला. १९ वर्षे १४ दिवस वयाच्या मुशीरने अंतिम फेरीत मुंबईच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. सचिनने १९९४-९५ मध्ये पंजाब विरुद्ध फायनल मध्ये शतक झळकावले होते. तेव्हा सचिन २१वर्ष ११ महिन्यांचा होता.
दरम्यान मुंबईने कालच्या २ बाद १४१ धावांवरून आपल्या डावाची सुरुवात केली. रहाणे ७३ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत १४३ चेंडूत ५ चौकार व १ षटकार लगावला. मुशीरने शतक मात्र संयमी शतक झळकावले. त्याने श्रेयस अय्यरसोबत शतकी भागीदारी केली. अय्यर षटकार मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने १११ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह ९५ धावा केल्या. अय्यरच्या जागी आलेला हार्दिक तमोर लवकर परतल्यावर मुशीरने शम्स मुलाणीसह संघाच्या डावाला आकार दिला. मुशीर १३६ धावांवर बाद झाला. त्याने ३२६ चेंडूंचा सामना करताना १० चौकार मारले. आज शार्दुल ठाकूर पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता बाद झाला. मुलाणीने ८५ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा ठोकल्या. कोटियन १३ धावांवर बाद झाला. अश्याप्रकारे मुंबईचा दुसरा डाव ४२८ धावांवर संपला.
विदर्भाला पहिल्या डावाच्या पिछाड़ीवर विजयासाठी ५३८ धावांचे आव्हान ठेवत मुंबईने विक्रमी विजेतेपदाकडे वाटचाल केली आहे. विदर्भकडून हर्ष दुबेने ५ बळी घेतले. यश ठाकूरने ३ गडी बाद केले. खेळ थांबला तेव्हा विदर्भने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद १० धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अजूनही ५२८ धावांची गरज आहे.
