Headlines
Home » महाराष्ट्र » महाराष्ट्राची ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप; ५ हजार २०० कोटींच्या जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार

महाराष्ट्राची ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप; ५ हजार २०० कोटींच्या जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

राज्यातील ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी आणि शाश्वत वीज निर्मितीसाठी जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांच्या या करारांतर्गत तीन उदंचन (पंप्ड स्टोरेज) जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार असून, यामुळे महाराष्ट्राच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.

ऊर्जा साठवणुकीत महाराष्ट्र होणार सक्षम

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची खरी ताकद पंप्ड स्टोरेज प्रकल्पांमध्ये आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून कमी खर्चात मोठी ऊर्जा साठवणूक करून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची क्षमता राज्यात निर्माण होईल. महाराष्ट्राने या क्षेत्रात आतापर्यंत ८०,००० मेगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडला असून भविष्यातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य आता सज्ज होत आहे.

लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नमूद केले की, पूर्वी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोडशेडिंगची समस्या आता ऊर्जा क्षेत्रातील बदलांमुळे दूर झाली आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमुळे प्रदूषणमुक्त आणि शाश्वत वीज निर्मिती शक्य होणार असून, राज्यात जवळपास १ लाख मेगावॅट क्षमतेचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे राज्यातील जनतेला २४ तास वीजपुरवठा सुनिश्चित होण्यास मदत होईल.

कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि शाहूवाडीत प्रकल्प

तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेद्वारे महत्त्वाचे प्रकल्प उभारले जाणार आहेत यात कुंभी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प- जिल्हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, कडवी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प-शाहूवाडी. या प्रकल्पांतून एकूण ११०० मेगावॅट वीज निर्मिती होणार असून, सुमारे ११०० तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

कार्यक्रमावेळी मान्यवरांची उपस्थिती

वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, आमदार डॉ. विनय कोरे, नवशक्ती निर्माण संस्थेचे अध्यक्ष नामदेव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!