मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा
राज्यातील वाहनांची फिटनेस तपासणी आता अधिक पारदर्शक आणि अद्ययावत होणार आहे. ही तपासणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे (एटीएस) केली जावी, यासाठी राज्यात ५३ केंद्रे उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे आता पारंपरिक मानवी तपासणी पद्धती लवकरच बाद होणार आहे.
१ एप्रिल २०२५ पासून नवीन नियम अनिवार्य
केंद्रीय मोटार वाहन नियम ६२ मधील २३ सप्टेंबर २०२३ च्या अधिसूचनेनुसार, परिवहन संवर्गातील सर्व वाहनांची फिटनेस चाचणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित केंद्रांमार्फत करणे १ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यात सध्या ७ केंद्रे पूर्ण झाली असून, उर्वरित ३७ केंद्रे ऑगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित होतील. प्रलंबित केंद्रांबाबत इतर विभागांशी समन्वय साधून ती तातडीने सुरू करण्याचे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
केंद्र सरकारकडून पोर्टलवरील निर्बंध हटवले
राज्यात स्वयंचलित केंद्रे पूर्ण होण्यास विलंब लागल्याने केंद्र सरकारने काही परिवहन कार्यालयांच्या ‘परिवहन/वाहन’ पोर्टल प्रवेशावर निर्बंध घातले होते. यामुळे वाहनधारक आणि वाहतूकदारांची मोठी गैरसोय होत होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे हा पोर्टल प्रवेश तातडीने पुनर्संचयित करण्याची मागणी केली. केंद्र सरकारने याला सकारात्मक प्रतिसाद देत आता हे निर्बंध उठवले आहेत.
उच्चस्तरीय बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षित वाहतूक आणि पारदर्शक वाहन तपासणीसाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
