T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक मध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. अफगानिस्तान कडून पराभूत झाल्याने ऑस्ट्रेलियासाठी ही लढत खूप महत्त्वाची झाली आहे.
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषक सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. विश्वचषकातील उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत रोमांच निर्माण झाला असल्याने सुपर-८ मधील आजची ही लढत अतीतटीची होईल. मात्र सामन्यावर पावसाचे सावट राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान सुपर-८ मधील सुरवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया सध्या ४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या अनपेक्षित पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मात्र कठीण झाला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आजच्या सामन्यात विजयी होणे आवश्यक आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान आतापर्यंत एकूण ३१ टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये भारतीय संघच वरचढ आहे. भारताने १९ सामने जिंकले असुनऑस्ट्रेलियाला ११ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर एक सामना रद्द झाला आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्याच फेरीतून बाहेर पडावे लागले होते, तर भारताला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
◆ कंगारुंना नमवत आज भारत पराभवाचा बदला घेणार ?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडे विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यातला पराभवाचा बदला घेण्याची रोहित सेनेकडे संधी आहे. १९ नोव्हेंबर रोजी विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. यामध्ये भारतीय संघाला ६ विकेटने पराभव पत्करावा लागला होता. त्या एका पराभवामुळे भारताचे एकदिवसीय विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं. त्या पराभवाचा बदला रोहितसेना घेणार का? याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष लागून आहे. हा सामना आज २४ जून रोजी सेंट लुसिया येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरु होईल. परंतु हवामान खात्याच्या अहवालानुसार, सेंट लुसियामध्ये सकाळी पावसाची ५५टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.
