Home » क्रीडा » पहिल्या कसोटी सामन्यात भारत पराभूत ; तब्बल ३६ वर्षांनी न्यूझिलंडने भारतात कसोटी सामना जिंकला !

पहिल्या कसोटी सामन्यात भारत पराभूत ; तब्बल ३६ वर्षांनी न्यूझिलंडने भारतात कसोटी सामना जिंकला !

बंगळुरु ( वास्तव पोस्ट ) : न्यूझीलंडने क्रिकेट संघाने भारत दौऱ्यातील ३ कसोटी सामन्याच्या मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात बंगळुरुतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर ८ विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे माफक आव्हान दिले होते. न्यूझीलंडने हे आव्हान २७.४ षटकांमध्ये २ विकेट्स गमावून पूर्ण केलं.

या विजयासह न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा हा भारतातील तिसरा आणि १९८८ नंतरचा म्हणजे तब्बल ३६ वर्षांनंतर पहीलाच विजय ठरला.

दरम्यान या सामन्यात पावसामुळे पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडने पहिल्या डावात रोहितसेनेला फक्त ४६ धावांवर गुंडाळले. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा करत ३५६ धावांची भलीमोठी भक्कम आघाडी घेतली. न्यूझीलंडने २३३ वर ७ विकेट गमावल्या होत्या. मात्र रचीन आणि टीम साऊथी या दोघांनी आठव्या विकेटसाठी अनपेक्षित १३७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला ४०० धावा पार करता आल्या. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात रचीन व्यतिरिक्त डेव्हॉन कॉनव्हे याने ९१ तर टीम साऊथीने ६५ धावांचे योगदान दिले, तर टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला २ तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन या दोघांनी १-१ विकेट घेतली.

टीम इंडियाने दुसऱ्या डावात ३५६ च्या प्रत्युत्तरात ४६५ धावा केल्या. मात्र टीम इंडियाने अखेरच्या ७ विकेट्स या केवळ ५४ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. या डावात भारतासाठी सर्फराज खान याने सर्वाधिक १५० धावांचे योगदान दिले. ऋषभ पंत ९९ धावा काढून बाद झाला. तर विराट कोहली ७० आणि कॅप्टन रोहित शर्मा चे ५२ धावांचे योगदान राहिले. त्यामुळे टीम इंडियाला १०६ धावांची आघाडी मिळाली, आणि न्यूझीलंडला विजयासाठी१०७ धावांचे माफक आव्हान ठेवलं.

न्यूझीलंडने हे आव्हान पाचव्या दिवशी २७.४ ओव्हरमध्ये २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलले. विल यंग आणि रचीन रवींद्र या दोघांनी आपल्या संघास विजयापर्यंत नेल. विल नाबाद ४८ आणि रचीन ३९ धावांवर नाबाद राहिले. त्याआधी डेव्हॉन कॉनव्हे याने १७ धावांचे योगदान दिले. तर कॅप्टन टॉम लॅथम याला भोपळाही फोडता आला नाही. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने दोन्ही विकेट्स घेतल्या. दरम्यान मालिकेतील दुसरा सामना हा पुण्यात २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!