Home » क्रीडा » उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरशः लोळविले ; पाकचे स्पर्धेतले आव्हान धोक्यात

उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरशः लोळविले ; पाकचे स्पर्धेतले आव्हान धोक्यात

T20 World Cup IND vs PAK : टी20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्युयॉर्क येथे झालेला सामना टीम इंडियाने अक्षरशः पाकिस्तानच्या घशातुन काढून घेत ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. पावसामुळे सामना उशीराने सुरु झाला. बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अ गटात झालेला हा सामना न्यूयॉर्कमध्ये रंगला. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या पाऊसामुळे नाणेफेकीला उशीर झाला. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र सामना सुरु झाल्यानंतर अमेरिके विरुद्ध अपयशी ठरलेल्या पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आपला जलवा दाखवत भारतीय फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. अवघ्या १०० धावात भारताचे सात फलंदाज तंबूत परतवुन भारतीय गोटात चिंतेचे वातावरण पसरविले होते.

T-20 विश्वकप सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारताला ११९ धावावर रोखले. विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात पाकने भारताला प्रथमच ऑलआउट केले.

पाकिस्तानला जिंकण्यासाठी मिळालेल्या १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना रडकुंडीला आणले.

जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांनी मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला धक्के दिले आणि सामन्याचे चित्रच पालटले. भारताने ६ धावांनी हा सामना जिंकून स्पर्धेतील पाकिस्तानच्या आव्हानालाच धक्का पोहचविला.

अमेरिकेविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजांनी T-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. नसीम शाह ( ३-२१) व हॅरिस रौफ (३-२१) यांच्यानंतर मोहम्मद आमीर (२-२३) व शाहीन शाह आफ्रिदी (१-२९) यांच्या माऱ्याला तोड नव्हती.

आपल्या बॅटने IPL- 2024 गाजवीणारा विराट कोहली (४) हा या ही सामन्यात अपयशी ठरला. रोहित शर्मा (१३), सूर्यकुमार यादव (७), शिवम दुबे (३), हार्दिक पांड्या (७) व रवींद्र जडेजा (०) हे विशेष धावांचे योगदान न देता चुकीचे फटके खेळून तंबूत परतले. रिषभ पंत व अक्षर पटेल (२०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी जोडलेल्या ३९ धावांनी धावसंख्येला आधार दिला, पण बाकीच्यांनी शरणागती पत्करली.

भारताकड़ून रिषभ पंत ने मिळालेल्या जीवदानांचा फायदा घेत ३१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ४२ धावा केल्या. अर्शदीप सिंगने ९ धावांचे योगदान दिले, परंतु भारताचा संपूर्ण संघ १९ षटकांत ११९ धावांवर तंबूत परतला. ४ बाद ८९ वरून भारताने पुढील ३० धावांत सहा विकेट्स गमावल्या. T-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताची ही प्रथम फलंदाजीनंतर तिसरी निच्चांक धावसंख्या ठरली.

पाकच्या डावाची सुरवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने आपल्या तिसऱ्या षटकात बाबर आजमला (१३) बाद केले. सूर्यकुमार यादवने स्लिपमध्ये जमिनिलगत अप्रितम झेल घेतला. तिसऱ्या अंपायरच्या मदतीने बाबरला झेलबाद देण्यात आले. बाबरने मोहम्मदने उस्मान खानसोबत ३२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अक्षर पटेलने उस्मानला (१३) पायचीत करून माघारी पाठवले.

हार्दिक पांड्याने तिसरी विकेट मिळवून देताना फखर जमानला (१३) रिषभकरवी झेलबाद केले. १५ व्या षटकात जसप्रीतने भारताला हवी असलेली विकेट मिळवून दिली. ३१ धावा करणाऱ्या मोहम्मद रिझवाचा त्रिफळा त्याने उडवला. पाकिस्तानला शेवटच्या पाच शटकात ३७ धावा पाहिजे होता.

अक्षरने १६व्या षटकात फक्त दोन धावा दिल्या. ११ ते १५ षटकांत पाकिस्तानला २६ धावाच करता आल्या आणि ३ विकेट्स गमावल्या. त्यामुळे ते अडचणीत आले. हार्दिकने पाकिस्तानवरील दडपणाचा फायदा उचलताना शादाब खानची (४) मोठी विकेट मिळवून दिली. हार्दिकने त्याच्या ४ षटकांत २४ धावा देत २ विकेट घेतल्या.

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा खऱ्या अर्थाने टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बुमराहने १९ व्या ओव्हरमध्ये फक्त ३ धावा १ विकेट घेतली. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये १८ धावांचं आव्हान राहिलं. अर्शदीपने या १८ धावांचा बचाव करत फक्त १२ धावा दिल्या आणि टीम इंडियाने हा सामना ६ धावांनी जिंकला. शेवटच्या षटकात १८ धावा करायच्या होत्या आणि त्या अशक्य होत्या. अर्शदीपने २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इमाद वासीमला (१५) बाद केले. रोहितने अचूक DRS घेतला. पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद ११३ धावा करता आल्या आणि भारताने ६ धावांनी सामना जिंकला.

■ पाकिस्तानचे आव्हान संकटात…
या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संकटात आले आहे. अ गटातील हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला आणि आता अमेरिका व भारत प्रत्येकी ४ गुणांसह आघाडीवर आहेत. पाकिस्तानने उर्वरित दोन सामने जिंकून त्यांचे ४ गुण होतील. अशा वेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!