T-20 Women’s Asia Cup : भारताने आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. तसेच सात वेळा ट्रॉफी जिंकणारा भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची नजर आता आठव्या विजेतेपदावर असेल.
दाम्बुला ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टीम इंडियाने महिला आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला आहे. आज झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा १० गडी राखून दणदणीत पराभव केला. बांगलादेशने दाम्बुलाच्या मैदानावर ८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने एकही विकेट न गमावता ११ षटकांत पूर्ण केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांग्लादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. आणि २० षटकात बांग्लादेशला फक्त ८०/८ धावांपर्यंत मजल मारता आली.
भारतीय संघाने ८१ धावांचा पाठलाग करतांना जोरदात सुरवात केली. सलामीवीर स्मृती मानधनाने ३९ चेंडूत नाबाद ५५ धावांचा तडाखा दिला. स्मृतीने नऊ चौकार आणि एक षटकार मारला. शेफाली वर्माने २८ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने २६ धावांची नाबाद खेळी करत भारताने सलग नवव्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

दरम्यान टॉस जिंकून बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून ८० धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५१ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ३२ धावांची खेळी केली. शोर्ना अख्तरने १८ चेंडूत १९ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. त्याने दोन चौकार मारले. भारताकडून रेणुका ठाकूर सिंग आणि राधा यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. रेणुकाने तिच्या चार षटकात केवळ १० धावा दिल्या आणि तीन विकेट घेतल्या. तर राधाने १४ धावा देत तीन बळी घेतले. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात खराब झाली. रेणुकाने पहिल्याच षटकात दिलारा अख्तरला ६ धावांवर पायचीत केले. यानंतर रेणुकाने तिसऱ्या आणि पाचव्या षटकात बांग्लादेशला धक्का दिला.
बांगलादेशने ४४ धावांत ६ विकेट गमावल्या यावरून भारताच्या भेदक गोलंदाजीचा अंदाज येतो. अशा स्थितीत निगार आणि शोरना यांनी सातव्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी करत बांग्लादेशाला ८० पर्यंत नेले. राधाने २० व्या षटकात निगार आणि नाहिदा अख्तरला बाद केले. नाहिदाचे खाते उघडले नाही. रितू मोनी ५, राबेया खान १, रुमाना अहमद १, मुर्शिदा खातून ४ आणि इश्मा तंजीम ८ धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंग आणि राधा यादवने प्रत्येकी ३ बळी, तर पूजा आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी १ गडी बाद केला.
कर्णधार हरमनप्रीत कौरने विजयानंतर खेळाडूंचं मनभरुन कौतुक केले. हरमनप्रीत म्हणाली की, “आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आम्ही जी काही चर्चा केली होती ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. आमच्यावर खूप दडपणआहे कारण आमचं आशिया क्रिकेटमध्ये वर्चस्व आहे. पण बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. आम्ही मैदानात उतरलो आणि करून दाखवलं. नेटमध्येही आम्ही घाम गाळला आहे. सातत्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहेआम्ही आता श्रीलंका आणि पाकिस्तान सामना आज बघू. त्यानंतर आमची रणनिती ठरवू”, असं हरमनप्रीत कौरने सांगितलं.
◆ महिला आशिया कप २०२४ पहिल्या उपांत्य फेरी सामनातील संक्षिप्त धावसंख्या :
● बांगलादेश : ८०/८ (२० षटके)
● भारत : ८३/० (११ षटके)
