Headlines
Home » सांस्कृतिक » प्रतापगडावर बुरुजाच्या पुनर्बांधणीत दगडाऐवजी चक्क कडप्प्याचा वापर ; पुरातत्व विभागाकड़ून काम बंदच्या सूचना

प्रतापगडावर बुरुजाच्या पुनर्बांधणीत दगडाऐवजी चक्क कडप्प्याचा वापर ; पुरातत्व विभागाकड़ून काम बंदच्या सूचना

सातारा दि.७ ( प्रतिनिधी ) – प्रतापगड किल्ल्यावरील ध्वज बुरुजाच्या मुख्य भागाच्या पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. मात्र या बांधकामात दगडाऐवजी चक्क काळ्या कडप्प्याचा वापर केला जात आहे. यामुळे समस्त शिवप्रेमी आणि प्रतापगड ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाने बांधकाम ठिकाणी येऊन पाहणी केल्यानंतर हे काम बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जागतिक वारसा स्थळांच्या नामांकन यादीमध्ये नुकताच प्रतापगड किल्ल्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे प्रतापगडावर होणारी सर्व कामे पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून होण्याची गरज होती, परंतु प्रतापगड किल्ल्याचा समावेश केंद्र व राज्य संरक्षित स्थळांच्या यादीमध्ये नसल्याने निधीअभावी काम रखडलेले होते. पडझड झालेल्या ध्वज बुरुजाचे काम मागील दोन वर्षांपासून ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लोकवर्गणीतून करण्यात येत होते.

प्रतापगड किल्ल्यावरील तटबंदी, बुरुज, बांधकाम पावसात भिजून व हवामानातील बदलामुळे ढासळत आहे. किल्ल्यावरील बांधकामाला ३६८ वर्ष झाली असुन दोन वर्षांपूर्वी ध्वज बुरुजाचा काही भाग ढासळला होता. या कामासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने परवानगी घेत खासगी ठेकेदाराकडून काम सुरू केले. मागील दोन वर्षांपासून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.

सिमेंटच्या गिलाव्यामुळे संपूर्ण किल्ल्याची व बुरुजाची शोभा जात होती. हे काम झाकण्यासाठी दगडाचा वापर करणे गरजेचे असताना दगड न वापरता चक्क कडप्पा फरशीचा वापर करण्यात आला असल्याने ग्रामस्थ तसेच शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. ध्वज बुरुजाच्या दुरुस्तीचाच एक भाग सिमेंट काँक्रीटमध्ये करण्यात आला होता. मागील काही वर्षांपूर्वी देखील याच ठेकेदाराकडून असेच निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. त्या कामामध्ये चक्क थर्माकोलचा वापर करण्यात आला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यामुळे यापूर्वी केलेल्या कामाची देखील चौकशी व तपासणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व शिवप्रेमींकडून होत आहे.

सदर कामास वाढता विरोध बघता काम बंद करण्याचा सूचना पुरातत्त्व विभागाने दिल्या आहेत. संबंधित ठेकेदारावर सह्याद्री प्रतिष्ठानने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

मागील तीन वर्षांपूर्वी प्रतापगडाची एका बाजूची तटबंदी ढासळल्यानंतर ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ने त्या परिसरात दुरुस्ती केली होती. तोपर्यंत ध्वज बुरुज ढासळला. त्या परिसरातही दुरुस्तीचे काम लोकवर्गणीतून या संस्थेने सुरू केले होते. परंतु वारसा स्थळाच्या अनुषंगाने काम होत नसल्याने व ग्रामस्थ आणि शिवप्रेमींच्या तक्रारी आल्यानंतर व पुरातत्त्व विभागाला यावर्षी निधी उपलब्ध झाल्याने ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ला येथील काम थांबवण्यास सांगितले आहे. पुरातत्त्व विभाग ताबडतोब या परिसरात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन होण्यासाठी येथे दुरुस्ती करणार आहे. राज्य शासनाकडे येथील दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर सादर करण्यात येत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!