Home » क्रीडा » थरारक सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेला पराभूत करत टी-20 विश्वकप क्रिकेट चषकावर नाव कोरले

थरारक सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेला पराभूत करत टी-20 विश्वकप क्रिकेट चषकावर नाव कोरले

Ind vs sa Final Match : भारताने आयसीसी टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टीम इंडीयाने टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. टीम इंडीयाने तब्ब्व १३ वर्षानंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे.

ब्रिजटाऊन ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध आज झालेल्या थरारक अंतिम सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने एका क्षणाला सामना गमावला असे वाटत होते. मात्र हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट करत टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने सीमारेषेवर गेम चेंजिंग भन्नाट कॅच घेतला.

त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केले आणि दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला १७७ धावांचं आव्हन दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये ८ बाद १६९ धावांवर रोखले. आफ्रिके कडून क्लासेन यानं फक्त २७ चेंडूमध्ये ५२ धावांची धमाकेदार खेळी केली. क्विंटन डी कॉक याने ३१ चेंडूत ३९ धावा जोडल्या. स्टब्स ३१ धावा काढून बाद झाला. मिलरने २१ धावांचे योगदान दिले. 

दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषकात आज भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन येथे खेळला गेला. अंतिम सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या निर्धारित २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. विराट आणि रोहित मध्ये पहिल्या गड्यासाठी २४ धावांची भागीदारी झाली. रोहित ९, पंत ०, सूर्यकुमार ३ धावा काढून बाद झाल्याने भारतीय संघाची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली होती. त्यानंतर विराट कोहलीने सावध खेळ करत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलसोबत ७२ धावांची भागीदारी केली. यानंतर कोहलीनं ४८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने ५९ चेंडूत एकूण ७६ धावा केल्या. तर अक्षर ३१ चेंडूत ४७ धावा करुन बाद झाला. शेवटी शिवम दुबेनं १ षटकार आणि ३ चोकारांच्या मदतीने १६ चेंडूत २७ धावा केल्या. जडेजा २ धावांवर बाद झाला, तर हार्दिक ५ धावावर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिक नॉर्सियानं प्रत्येकी २ तर मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी १-१ विकेट घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!