Headlines
Home » शैक्षणिक » शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा : जीवन महाजन

शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा : जीवन महाजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान मंडळाचे भुसावळ येथील उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरचे चेअरमन जीवन महाजन यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी महाजन यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक आर. बी.ठाकरे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांची सुबक, आकर्षक मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात महाजन यांनी प्रतिपादन केले की, विज्ञान म्हणजे विद आणि ज्ञान. विद म्हणजे शोधणे तर्क लावणे. जे आहे त्याचा शोध घेणे, उकल करणे, तत्व शोधणे म्हणजे विज्ञान. विज्ञानाची सुरुवात आपल्या शरीरापासूनच होते म्हणून आपल्या शरीराचा अभ्यास प्रथम महत्त्वाचे असल्याचे हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिले. त्यांनी पुढेही असेही विशद केले की, श्वास तंत्राच्या माध्यमातून मस्तिष्कचा विकास होतो. परिणामी सकारात्मक विचार वृध्दींगत होतात.

अगस्त संहितेमध्ये सुमारे ३००० वर्षांपूर्वी विज निर्मितीचा शोध सर्वप्रथम करण्यात आलेला आहे. आपले प्राचीन ऋषी-मुनी हे वैज्ञानिकच होते. विज्ञानातील अनेक शोध भारतीय ऋषी मुनींनी लावलेले आहेत. विज्ञानाचे मुळ हे संस्कृत मध्येच आहे. आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांचा विदेशात खुप मोठ्या प्रमाणात अभ्यास व संशोधन होत आहे. संशोधनाकडे वळायचे असेल तर समाजातील समस्या काय आहे? ते शोधा व त्या समस्या कशाप्रकारे सहज व सुलभतेने सोडविता येतील यासाठी प्रयत्न करा व अभ्यास करा. थॉमस एडिसन बल्प चा शोध लावताना २७७४ वेळा अपयशी ठरले. अपयशाला घाबरू नका तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत यश मिळत नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील डॉक्टर भास्कर हलामी या शास्त्रज्ञाची प्रेरक कथा त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली व शास्त्रज्ञ बनण्यासाठी प्रेरित केले. यावेळी त्यांनी अनेक छोटे छोटे प्रयोग करून प्रयोगाद्वारे अभ्यास कसा करावा? हे समजावून सांगितले. तसेच इस्रो संशोधन संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती देत विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.आर. बी.ठाकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करतांना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम विज्ञान शिकून त्यातील बारकाव्यांचे सूक्ष्म निरीक्षण शक्तीने आकलन करून उकल करावी. यातून तुमची वैज्ञानिक दृष्टी वाढीस लागेल पर्यायाने वैज्ञानिक बनण्यास मदत होईल.
याप्रसंगी प्रा.स्वाती बऱ्हाटे (समन्वयिका विज्ञान शाखा) उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळ अध्यक्षा प्रा.स्वप्ना पाटील, सूत्रसंचालन प्रा.वीणा भोळे, आभार प्रदर्शन प्रा.जी.एस. सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रमोद भोई, प्रा.विनोद वैदकर, प्रा.संदीप वानखेडे, प्रा.शोभना कावळे, प्रा.शीतल काळे, प्रा.धनश्री पाटील, प्रा.चारुलता बेंडाळे, प्रा.पल्लवी फिरके, विज्ञान मंडळाच्या सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!