मुंबई | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानात केकेआर कडून २५ धावांनी पराभूत झाल्याने ते प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडले. वेंकटेश अय्यरच्या ७० धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने विजयासाठी १७० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबई इंडियन्सचा डाव १८.५ षटकात १४५ धावांवर आटोपला. मुंबईसाठी हे आव्हान मोठे नसले तरी मुंबईच्या संघाची सुरुवातीपासून ठराविक अंतरावर गडी बाद होत गेले. एकही मोठी भागीदारी न झाल्याने १७० धावांचा पाठलाग करतांना त्यांची चांगलीच दमछाक झाली. सूर्यकुमार यादवने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. पण जोरदार फटका मारन्याच्या नादात सूर्या बाद झाला आणि येथेच सामना मुंबईच्या हातून निसटला. केकेआरने २४ धावांनी मुंबईवर यावेळी विजय साकारला.
केकेआर ने दिलेल्या १७० धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. कारण दुसऱ्या षटकापासूनच यावेळी मुंबईच्या संघाला धक्के बसायला सुरुवात झाली. ईशान किशनच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला तो १३ धावां काढून बाद झाला. रोहित शर्माला ११ धावांवर सुनील नरायणने बाद केले. रोहितला आईपीएल मध्ये आतापर्यंत १० वेळा त्याने बाद केले आहे. कर्णधार हार्दिक पंड्या फक्त एक धाव करून बाद झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सची ६ बाद ७१ अशी अवस्था झाली होती. पण तरीही मुंबईचा संघ हा सामना हरणार नाही, असे वाटत होते. कारण त्यावेळी सूर्यकुमार यादव मैदानावर उभा होता. सूर्याने ३५ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी मुंबईला आजच्या सामन्यात गोलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली. नुवान थुसाराने आपल्या पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर केकेआरचा सलामीवीर फिल सॉल्टला ५ धावांवर बाद केले. पुढच्या षटकात नुवानने अंगक्रिश रघुवंशीला १३ धावांवर आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही सहा धावांवर चालते केले. सुरवातीच्या या धक्क्यांमुळे केकेआरची अवस्था ३ बाद २८ अशी झाली होती. पण त्यानंतर वेंकटेश अय्यरने डाव सावरत ५२ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ७० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे केकेआरच्या संघाची धावसंख्या १६९ पर्यंत पोहचली. मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत केकेआरच्या फलंजांना मोकळीक दिली नाही. मात्र आजच्या पराभवाने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचे आव्हान अखेर IPL 2024 मधून संपुष्टात आले.
