Home » आंतरराष्ट्रीय » इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला !

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिन, हमास व लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता मोठा भडका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे इस्रायलच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाह संघटनेने आता थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेने नेत्यानाहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला केला आहे.

इस्राइल सरकारने हा दावा केला असून हे ड्रोन लेबनॉनमधून आल्याचे म्हटले आहे. एका इमारतीवर या ड्रोनचा स्फोट झाला. याशिवाय, या भागात आणखी दोन ड्रोन डागण्यात आले. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

दरम्यान या ड्रोन हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू सुरक्षित असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. ड्रोन हल्ला झाला तेव्हा नेतान्याहू आपल्या निवासस्थानी नव्हते. या हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये सतर्कतेचे सायरन वाजवण्यात आले.

हिजबुल्लाहला इराणचा पाठिंबा असुन हिजबुल्लाहसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. या आधी इस्राइलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले तीव्र करणार असल्याचा इशारा शुक्रवारी हिजबुल्लाहने दिला होता.

हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेचा कमांडर हसन नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाह आणि इराण हे दोन्ही देश संतापले आहेत. हमासचा म्होरक्या याह्या सिनवार यालाही इस्रायलने ठार केले आहे. दहशतवादी संघटनांच्या नेत्यांच्या हत्येमुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इराणच्या मदतीनं हिजबुल्लाह आणि हमास हे दोन्ही देश इस्रायलविरोधातील युद्ध तीव्र करू शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!