Headlines
Home » महाराष्ट्र » BREAKING: रुपाली चाकणकर पायउतार! भोंदू खरात प्रकरणाने सरकारची नाचक्की; ‘वर्षा’वरून सुटले राजीनाम्याचे आदेश

BREAKING: रुपाली चाकणकर पायउतार! भोंदू खरात प्रकरणाने सरकारची नाचक्की; ‘वर्षा’वरून सुटले राजीनाम्याचे आदेश

मुंबई | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क

नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळिकीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ही कारवाई झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि कडक भूमिका

​अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर, रुपाली चाकणकर त्याचे पाद्यपूजन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. यावरून विरोधकांनी आणि सामाजिक संघटनांनी सरकारला धारेवर धरले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बोलावून घेतले आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगत त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या.

नेमका वाद काय होता?

​सिन्नर येथील अशोक खरात याच्या ‘श्री शिवनिका संस्थान’मध्ये रुपाली चाकणकर विश्वस्त असल्याचे समोर आले होते. तसेच, एका व्हिडिओमध्ये त्या खरातची तुलना थेट विठ्ठलाशी करताना दिसत होत्या. महिला आयोगासारख्या जबाबदार पदावर असताना एका भोंदूबाबाचे उदात्तीकरण करणे, हे सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरले होते. अखेर मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.

दोन्ही पदे धोक्यात?

​केवळ महिला आयोगाचे अध्यक्षपदच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांना द्यावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!