जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी.डी. बेंडाळे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. उदय कुमठेकर (नांदेड) यांनी ‘स्वामी विवेकानंदांच्या विचारांची समकालातील उपयुक्तता’ या विषयावर प्रतिपादन करताना ऋषी, आचार्य, संत व प्रबोधनकार या चार भारतीय परंपरा ह्या उपासना, ज्ञान, भक्ती व कर्म मार्गावर आधारित असून स्वामी विवेकानंद हे प्रबोधनकार या परंपरेत येत असून कर्ममार्गावर त्यांनी आपले विचार मांडले आहेत.
विवेकानंदासारखे योगीसंन्यासी होण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असायला हवी. आजच्या काळात विवेकानंदांच्या विचारांची उपयुक्तता आहे. विवेकानंदांनी सांगितलेल्या योगसाधनेतील राजयोग प्राप्त करण्यासाठी पूर्वसाधना, अहिंसा व सत्य यावर आधारित आपले आचरण असायला हवे. सत्पुरुषांना आपण आपल्या बुद्धीच्या मर्यादेत वाटून घेत असल्याने समाजात फुटीरता निर्माण होते. हे होऊ नये म्हणून आपण आपला अध्यात्मिक स्थर उंचावला पाहिजे. असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार सांगितलेच. शिवाय भारतीय तत्त्वज्ञान परंपरा देखील उलगडून सांगितली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव अँड. प्रवीणचंद्र जंगले होते. तर उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे, समन्वयक प्रा.उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.ईशा वडोदकर यांनी केले. कार्यक्रमानंतर कार्यक्रम समिती प्रमुख प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी रेडिओ मनभावन 90.8 साठी डॉ. उदय कुमठेकर यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमप्रसंगी सभागृहात शहरातील विविध मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. छाया चौधरी, डॉ. श्रद्धा पाटील, प्रा हेमंत पिंपळे, संदीप गव्हाळे, प्रा.सुरेश शिंदे, प्रा.अर्चना जाधव, प्रा.पूजा सायखेडे, प्रा.वर्षा पाटील, प्रा.पल्लवी फिरके, प्रा.प्रसाद देसाई, शिक्षकेतर कर्मचारी अजय काळे, चेतन वाणी, विजय जावळे, उदय पाटील, गोकुळ पाटील, समाधान पाटील, ठाकूर यांनी परिश्रम घेतले.
