पुणे ( वास्तव पोस्ट ) : मद्यशौकिनांकडून ‘स्काॅच’ ला मागणी असते. महागड्या अशा ‘स्काॅच व्हिस्की’च्या बाटल्यांमध्ये भेसळ करण्यात येत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करुन भेसळयुक्त स्काॅचच्या २४ बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
धनजी जेठा पटेल असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. नववर्ष आणि नाताळ सणाच्या निमित्ताने उत्पादन शुल्क विभागाकडून भेसळयुक्त मद्य विक्री, तसेच परराज्यातील मद्याची तस्करीवर नजर ठेवण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाकडून गस्त घालण्यात येत होती.
चिंचवड-पिंपरी लिंक रस्त्यावरुन एका वाहनातून भेसळयुक्त बनावट स्कॉच विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक सुजित पाटील यांना मिळाली. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तेथे सापळा लावला. त्यावेळी येथील ईगल गार्डन सोसायटी समोरुन एक रिक्षा निघाली होती. पथकास सदर रिक्षा संशयास्पद वाटल्याने रिक्षा थांबविली. रिक्षात स्काॅचच्या २४ बाटल्या सापडल्या. धनजी पटेल याला पथकाने ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा मारूंजी परिसरातून त्याने मद्याच्या बाटल्या आणल्याची माहिती दिली.
