जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बालदिनाचे औचित्य साधून खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालयात रेडियो मनभावन 90.8 एफ.एम ने लहान विद्यार्थी मित्रांचा रेडियो जॉकी सप्ताह सुरू केला आहे. दि.१४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सदर सप्ताह साजरा होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि पर्यावरण यावर संवाद साधायचा आहे.
बालदिनी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवशी रेडियो मनभावनचे संचालक अमोल देशमुख यांनी विद्यार्थ्यांना रेडियोचे कामकाज कसे चालते याचे प्रात्यक्षिक दिले. ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या भूमिका चौधरी, लक्ष्मी सोनवणे, अनुष्का सोनवणे, पूर्वा चौधरी, श्रेया धोबी यांनी मतदान जनजागृती आणि आपले हक्क यावर कार्यक्रम सादर केला.

त्यानंतर दिव्यांशी जयदीपकुमार सिंग सेंट टेरेसा कान्वेंट स्कूल च्या विद्यार्थीनीने जल वायु परिवर्तन यावर भाष्य केले. तर ओरिऑन सीबीएससी स्कूलची विदयार्थीनी आर.जे. विभूती देशमुख हिने पर्यावरण समृद्धी काळाची गरज या विषयावर संवाद साधला.
यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल अर्थात चाचा नेहरू यांच्या गोष्टी आणि छान छान बालगीते छोट्या आर जे नी श्रोत्यांसाठी सादर केली. कार्यक्रमास रेडियो मनभावनचे संचालक अमोल देशमुख,राहुल पाटील, साहिल पाटील आदी उपस्थित होते.
