Headlines
Home » महाराष्ट्र » वारकरी संतपूजन तथा शांतीब्रह्म व तुलसीदास पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

वारकरी संतपूजन तथा शांतीब्रह्म व तुलसीदास पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

आळंदी ( वास्तव पोस्ट ) : वारकरी संप्रदायात अत्यंत मानाचे समजले जाणारे असे ‘तुलसीदास पुरस्कार’ मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी वारकरी संतपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला. सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर), ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त ह.भ.प.संजय महाराज पाचपोर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प.मारुती महाराज कुरेकर यांना ९३ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शांतीब्रह्म पुरस्कार आणि ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांना ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा, राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मोठी संत परंपरा आपल्याला लाभली आहे. संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. कारण धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार, चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात, दुष्ट विचार दूर जातात. मला काय मिळाले यापेक्षा दुसऱ्याला काय देणार हे महत्त्वाचे आहे. स्वत:साठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणाऱ्यांपैकी वारकरी संप्रदाय आहे, असे मत याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!