जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दि.२८ रोजी गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्क दरम्यान झालेल्या भीषण अपघातात विवाहितेसह एक तरुणी जागीच गतप्राण झाल्या. तर त्यांच्यासोबत असलेला एक लहान बालक गंभीर जखमी झाला असुन एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
खोटेनगरकडून शहराकडे येत असतांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात विवाहिता, तरुणी आणि दोन वर्षीय बालक दुचाकीवर स्वार होत्या. महामार्गाच्या बाजुलाच असलेल्या एका इमारतीच्या सीसीटीवी कॅमेऱ्यामध्ये हा अपघात टिपला गेला आहे. एकाच दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रक यांमध्ये त्यांची दुचाकी आली व ट्रकच्या डाव्या बाजूच्या चाकांखाली आल्याचे या सीसीटीवी फुटेज मध्ये दिसुन येत आहे.
काल दुपारीच अपघातास्थळी वास्तव पोस्ट ने भेट देऊन सदर महामार्गाच्या त्या ठिकाणाची पाहणी केली असता अपघाताच्या मूळ कारणाची शक्यता म्हणून महामार्गाच्या मधोमध तेथे असलेल्या

एका खड्डयाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. आणि संध्याकाळी तसेच रात्री उशिरा सोशल मिडियात व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रत्यक्ष घटना घडली तेव्हाचा क्षण बघितला आणि महामार्गावरील खड्डयांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.
आज सकाळी पुन्हा एकदा अपघात स्थळी जाऊन उतारावरुन येणाऱ्या वाहनांचे चित्रीकरण करत असतांना सदर खड्डा खडी व डांबराच्या मिश्रणाने बुजविण्यात आल्याचे दिसून आले.

याबाबत परिसरातील रहिवाशींकडून माहीती घेतली असता रातोरात डांबरीकरण (पॅच वर्क) करण्यात आल्याचे सांगण्यात आले. येथे एक गोष्ट उल्लेखनीय वाटली ती म्हणजे खड्डा (पॅच) बुजवतांना वापरण्यात आलेले डांबराचे प्रमाण. असेच योग्य प्रमाण शहरातून जाणाऱ्या संपूर्ण महामार्गासाठी वापरले असते तर इतक्या कमी वेळात महामार्गावर एवढे खड्डे पडलेच नसते. परिणामी महामार्गावरील अशा या खड्डयांमुळे कालपर्यंत झालेल्या एकूण अपघातांमध्ये नाहक बळी देखील गेले नसते.
गेल्याच आठवड्यात आम्ही एका मथळ्याखाली उल्लेख केला होता की,

राष्ट्रीय महामार्ग : जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार तरी कधी ? यामध्ये शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून चाळणी झाल्याचा उल्लेख देखील करण्यात आला होता. दरम्यान शिव कॉलनीकडून शहराकडे जातांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया प्रवेशद्वार ते जिल्हा उद्योग केंद्रासमोरील तब्बल २०० मिटर अंतराच्या रस्त्याच्या कामास जवळजवळ करोड रुपयांपेक्षा अधिक खर्च करूनही अपयशी असलेल्या न्हाई तसेच संबंधित सगळ्याच विभागांकडून या छोट्या मात्र जीवघेण्या खड्डयांकडे सफसेल कानाडोळा करण्यात आला असुन नेहमीच वेळकाढू धोरण अवलंबवीले जात आहे. काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातून जाणाऱ्या संपूर्ण महामार्गाचेच नव्याने डांबरीकरण मंजूर झालेले असुन, त्यावर एक थर दिला जाणार आहे. आता त्याचा मुहूर्त कधी निघणार याची प्रतीक्षा आहे.
कालच्या या अपघातास जबाबदार ट्रॅक्टर चालक, ट्रक चालक की खड्डा (म्हणजेच महामार्गाशी सबंधित विभाग) हा मोठा प्रश्न असला तरी तपासाची तप्तरता आणि वेगच याची दिशा ठरवणार आहे. विशेष म्हणजे भर दुपारी अपघात झाला. ट्रक खाली येऊन दोन जीव जागीच गेले. आणि तेथून तोच पूर्ण लोडेड ट्रक आरामात जळगाव शहरात दाखल होतो. शिवाय शहराच्या बाहेर निघूनही जातो. याआधीही जे अपघात झालेत त्यातील किती तपास पूर्ण करून निकाली निघाले याबाबत विचारणा न केलेलीच बरी. वाहन चालकांनी देखील वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
दुचाकीवर हेल्मेट आवश्यकच आहे, मात्र दुचाकीच्या साईड मिरर पेक्षा आपले डोके महत्वाचे आहे याचेही भान ठेवा. सकाळी जेव्हा आम्ही महामार्गावर होतो तेव्हा काही दुचाकी चालकांनी हेल्मेट आपल्या डोक्याऐवजी आपल्या दुचाकीच्या साईड मिररवर अडकवलेले दिसून आले. तसेच एक युवक दुचाकी

चालावतांना उजव्या हातात एक्सरेलेटर आणि आपल्या डाव्या हातात मोबाईल घेऊन बोलत तर होताच मात्र कहर म्हणजे त्याचा डावा पाय इंजिन गार्डच्या रॉडवर हेडलाईटच्या दिशेने सरळ ठेवलेला होता. हा प्रकार काल झालेल्या अपघात ठिकाणच्या खड्डयाजवळून जात असतांना कॅमेऱ्यात कैद झाला.
शेवटी शासन, प्रशासन, संबंधित विभाग तसेच जनतेचे प्रतिनिधी यांना एकच सांगणे आहे की, कालच्या अपघातानंतर नाहक दोन बळी गेल्यावर आतातरी डोळे उघडा आणि लवकरात लवकर खड्डेमुक्त महामार्ग बनवा. तसेच महामार्गाच्या हद्दीत येणारी मग ते भाऊ, दादा, आबा, नाना, काका, मामा, अण्णा, सगे सोयरे, परके, नातेगोते यांचे वरद हस्त असलेल्यांची सर्व अतिक्रमणे त्याचप्रमाणे ठीकठिकाणी असलेल्या खवैयांच्या हातगाड्या, वाहकांचे लक्ष विचलित करणारी रंगिबेरंगी विविध वस्तु विक्रेते, फळविक्रेते, चिकन, मच्छी शॉप, रेती, माती, खडी डेपो, भंगार, मनपा घंटा गाडींनी जमा केलेला कचरा, उकीरडा इत्यादींनी अडकवून ठेवलेला महामार्गाचा भाग तात्काळ मोकळा करून समांतर रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा एवढीच अपेक्षा.
दरम्यान येथे एक बाब सांगावीशी वाटते की, दि.२६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय टोकाचा मात्र चांगला निर्णय घेऊन इंदापूर, लोणेरे येथे रस्त्यांची कामे आणि अंडरपासची कामे अर्धवट ठेवल्यामुळे ज्या नागरिकांचे जीव गेले त्यासाठी सदर कंत्राटदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
अशाच प्रकारचे निर्देश जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाबाबत का देऊ नये असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या पुढील जळगाव दौऱ्यावेळी नागरिकांनी निवेदनाद्वारे का करू नये ?
