जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कविवर्य ना.धों. महानोर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मू.जे. महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘ह्या शेताने लळा लाविला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला कविवर्य ना.धों. महानोर यांच्या प्रतिमेला भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसुर, सामाजिकशास्त्रे प्रशाळा संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या पाटील यांनी केले.
अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेले पळसखेड गावात जन्मेलेले ना.धो. महानोर लहानपणापासूनच शेतात कष्ट करत निसर्ग, गावातली सामान्य माणसं हेच त्यांच्या साहित्याचे प्रेरणास्थान ठरले. शेतशिवार, आमदार, लेखक, कवी, गीतकार असा आयुष्य प्रवास असणाऱ्या महानोर यांची विद्यार्थी दशेत असतांना पहिली कविता मू.जे.महाविद्यालयाच्या अजिंठा या नियतकालिकातून प्रकाशित झाली होती. आपली मातीशी-बोलीशी सहजतेने नातं जोडणारी हिरव्या बोलीची महानोरांची शब्दकळा विद्यार्थ्यांनी अनुभवली.

‘गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी झोपडी काळीज माझे’ अशी आंतरिक संवेदना प्रकट करणाऱ्या महानोर यांना मराठी विभागाच्या वतीने आदरांजली ‘ह्या शेताने लळा लाविला’ या विशेष कार्यक्रमातून स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. योगेश महाले यांनी निवेदन करून आपल्या महानोर यांच्या आवाजातील कविता, त्यांनी लिहिलेली चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणी व आपला कवितेचा प्रवास दृकश्राव्य माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपीचंद धनगर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
