जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील जिल्हा कारागृहातील खळबळजनक घटनेने जळगाव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. आज सकाळी चक्क जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या एका संशयिताची हत्या झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात यांचा ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळ येथे खून करण्यात आला होता. या घटनेत रविंद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचा गोळीबारात मृत्यु झाला होता. या खून प्रकरणातील संशयित हे जळगाव जिल्हा कारागृहात असुन या संशयितांमध्ये अंतर्गत वादातुन एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार दि.९ रोजी दुपारी मोहसीन अजगर याचे दुसऱ्या एका संशयित आरोपीसोबत भांडण झाले होते. दोघांमध्ये दुपारपासुनच शाब्दिक बाचाबाची सुरुच होती. दरम्यान संशयिताने मोहसीन अजगर याच्यावर रात्री दीड वाजेच्या सुमारास हल्ला केला. यात मोहसीन असगर गंभीर जखमी झाल्याने असगर यास वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
घटनास्थळी जिल्हा पेठ पोलिसांनी भेट दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. जिल्हा कारागृहात झालेल्या या खुनामुळे जिल्हा कारागृह प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
