जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगावच्या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत चक्क दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. सरकारी कार्यालयात दारुच्या बाटल्या आढळणे हे काही नवीन नाही. या आधीही अनेक सरकारी कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या आहेत. परंतु भूजल गुणवत्ता प्रयोगशाळेतलं प्रकरण थोडे वेगळे आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की, याच बाटल्यांमध्ये गुणवत्ता तपासण्यासाठी आणलेले पाणी ठेवले जात होते. या पाण्यासाठी प्रयोगशाळेतूनच दारूच्या बाटल्या दिल्या जातात असा आरोप होत आहे. जिल्हा परिषदेमार्फत पाण्याचे नमुने घेण्याकरिता योग्य आणि उच्च प्रतिच्या बाटल्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोगशाळेत वितरीत करण्यात आल्या होत्या.
विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात दूषित पाण्याद्वारे होणारे संसर्ग रोग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डॉक्टर व संबंधित विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली होती. यात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, ग्रामपंचायत त्यांच्याकडून गावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र हे पाण्याचे नमुने दारूच्या बाटलीत साठवण्यात आले आहेत. दारूच्या बाटलीत ठेवलेल्या पाण्याची गुणवत्ता तपासतांना त्याची शुद्धता कशी तपासली जाणार ? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार सदर धक्कादायक बाब ही एका सामाजिक कार्यकर्त्यामुळे उघडकीस आल्याचे समजते. हा सामाजिक कार्यकर्ता स्वतः एका बाटलीत पाण्याचा नमुना तपासणी करीता घेऊन गेले असता त्यांना बाटली ठेवण्यास सांगितले तेव्हा त्यांना तेथे ह्या बाटल्या आढळून आल्याची माहीती मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते यांनी वरिष्ठांना याबाबत विचारणा केली असता उड़वा उडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांचेकडून तात्काळ दखल घेण्यात आली असुन वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागास कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.
