Home » जळगाव » म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम कासव गतिने सुरु ; वाहतुकीस २०२५ उजाडणार

म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम कासव गतिने सुरु ; वाहतुकीस २०२५ उजाडणार

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील म्हसावद हे रेल्वे स्थानक असलेले गाव असुन बाजार पेठेचे ठिकाण आहे. या ठिकाणाहून जळगाव, पाचोरा आणि एरंडोल या तीन तालुक्यांशी वाहतुकीद्वारे संपर्क साधता येत असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. तसेच धुळ्याकडून मराठवाडा व विदर्भात जाण्यासाठी येथून सुलभ मार्ग आहे.

दरम्यान म्हसावद येथे रेल्वे फाटका जवळ उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. हे काम कासवालाही लाजवेल अशा संथ गतिने तब्बल दशकापेक्षाही अधिक कालावधीपासून सुरु आहे. अजूनही या पुलावरुन रहदारी सुरु होण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. सध्या या उड्डाण पुलाच्या ठिकाणी गर्डर लॉन्चींग आणि स्लॅब टाकण्याचे काम सुरु झाले आहे. हा पुल पूर्ण झाल्यानंतरच येथील रेल्वे गेट बंद करता येणार आहे.

दरम्यान या पुलाच्या एका बाजूने काम पूर्ण झाले असुन, गावातून जाणाऱ्या दुसऱ्या बाजुच्या कामाला मागील दोन वर्षापूर्वी सुरवात झालेली आहे. २०२४ पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज होता, मात्र कामाचा वेग बघता या पुलावरील वाहतुकीस २०२५ साल उजाडणार आहे. पुलाचे काम लवकर करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मक्तेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत. पुलावरील सतरा पैकी फक्त चारच स्लॅबचे काम झाले असुन तेरा स्लॅबचे काम बाकी आहे. गावातुन जाणाऱ्या भागकडील गर्डरचे काम झाल्यावर स्लॅब आणि आरई वाल चे काम एकाचवेळी हाती घेणार आहेत.

उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यावर येथील रेल्वे गेटच्या जागेवरच भूयारी मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे. भूयारी मार्गाचे सर्वेक्षण रेल्वे विभागाकडून करण्यात आले असुन दोन्हीबाजूने भिंती बांधूंन भूयारी मार्ग केला जाणाऱ आहे. शेतकरी वर्गासाठी, रेल्वे स्टेशन परिसरातील वस्ती तसेच आजुबाजुच्या खेडेगातील लोकांना हा भूयारीमार्ग फायदेशीर ठरणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आला असुन या भूयारी मार्गासाठी रेल्वे प्रशासनाकडून दहा कोटीचे अंदाजपत्रक तयार करून देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!