Home » आरोग्य » धक्कादायक : जळगाव जिल्हा रूग्णालयात गेल्या आठ दिवसांत ५० मृतदेह ; त्यापैकी १६ बेवारस !

धक्कादायक : जळगाव जिल्हा रूग्णालयात गेल्या आठ दिवसांत ५० मृतदेह ; त्यापैकी १६ बेवारस !

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :
जळगाव जिल्हा रूग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या ८ दिवसात रूग्णालयात तब्बल ५० मृतदेह आले आहे. त्यातील १६ मृतदेह हे बेवारस असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या जळगावात उकाडा प्रचंड वाढत चालला असुन उष्माघाताने हे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्या पैकी हे एक कारण असू शकते असं रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचा परिणाम दैनंदीन जिवनावर होत आहे. रात्रीचे तापमान देखील जास्त असतानाच याच कालावधीत जळगाव जिल्हा रूग्णालयात एकामागून एक ५० मृतदेह दाखल झाले आहेत. त्यातील १६ मृतदेह हे बेवारस असल्याची धक्कादायक माहिती रूग्णालयाचे अधिष्ठाता गिरीष ठाकूर यांनी दिली आहे. जे बेवारस आहेत त्याचा वयोगट हा ४० ते ४५ हा आहे. तर काही जण ६५ ते ७० वयोगटातील आहेत. हे बेवावर रस्त्याच्या कडेला राहाणारे, गरिब किंवा भिकारी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातील अनेकांना निमोनिया, लिव्हर संबधी आजार होते असे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे.

हे मृत्यू उष्माघातामुळे आहे का याबाबत डॉ. गिरीष ठाकूर यांच्याकडून माहिती घेतली असता तसे सांगणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र उन्हाच्या त्रासामुळे मृत्यूची शक्यता देखील त्यांनी नाकारली नाही.

दरम्यान हे बेवारस मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहेत. बेवारस मृतदेहांचे शवविच्छेदन करून सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!