जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे कापूस बियाणे जादा दराच्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे ६५९ या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने एका विक्रेत्याकडे डमी ग्राहक पाठवला. सदर केंद्रावर विक्रेत्याने ८६४ रुपये किंमतीचे कापूस बियाण्याचे पाकीट ह्या डमी ग्राहकास बाराशे रुपयांना विक्री करताना पथकाने पकडले. यावेळी विक्री केंद्राची तपासणी करण्यात येऊन पंचनामा केला आणि विक्री बंद करण्याचे आदेश या केंद्रास देण्यात आला. परवान्यावर पुढील कार्यवाहीसाठी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील सुरज जगताप कृषी विकास अधिकारी, विजय पवार मोहीम अधिकारी, विकास बोरसे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, धीरज बडे कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक है सर्व सदर सापळा पथकात सहभागी होते.
कृषी विक्रेते यांनी जाता दराने विक्री केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिला असून ज्यादा दराने बियाणे विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव, कृषी विकास अधिकारी जळगाव किंवा तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी.
शेतकरी बंधूंनी विशिष्ट वाणाच्या मागणी न करता विक्रेता यांच्याकडे उपलब्ध असलेले मान्यताप्राप्त वाण हे संकरित BG 2 प्रकारातील असून योग्य पिक व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड रोग व्यवस्थापन व पाण्याचे नियोजन केल्यास चांगले उत्पादन येते.
शेतकरी बंधूंनी गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन व सध्याचे तापमान पाहता कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

