जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेली कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.
जळगाव | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शहरात सध्या विविध भागात रस्त्यांचे कामं सुरु आहे. आज कलेक्टर आयुष प्रसाद यांनी महानगरपालिका अंतर्गत नव्या रस्त्यांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद देखील साधला .यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापकांकडून गुणवत्ता तपासणी केली. रस्ते झालेल्या गल्लीतील लोकांशी संवाद साधला असता, लोकांनी पूर्वीच्या रस्त्यामुळे खुप धुळ येत होती. आता मात्र रस्ते स्वच्छ आणि धुळ नसल्यामुळे आरोग्यपूर्ण वाटते आहे अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहायक नियोजन अधिकारी राहुल इधे,महानगर पालिकेचे अभियंता, इतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी मोजली रस्त्याची मजबुती :
रस्ता मजबूत झाला आहे की नाही हे मोजण्यासाठी एक यंत्र असते. तें हातात घेवून स्वतः त्याची मजबुती किती आहे ती मोजली आणि समाधान व्यक्त केले. चांगले आणि मजबूत रस्ते हे शहराच्या भौतिक सुविधेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे. तें चांगलेच झाले पाहिजेत म्हणून आपण स्वतः हे रस्ते पाहण्यासाठी आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद रस्त्याची पाहणी करत असताना एका भाजी विक्रेत्याला थांबविले, त्याला नाव, गाव, किती वर्षापासून भाजी विकतो हे विचारून, या ठिकाणी रस्ता झाल्यामुळे तुझ्या जीवनात काय फरक पडला विचारले… त्यावेळी तो म्हणाला ‘ मी इथे नियमित भाजीचा गाडा घेऊन येतो, पूर्वी गाडा ढकलून थकून जायचो. आता या नवीन गुळगुळीत रोडवर थकवा जाणवत नाही. रात्री शांत झोप लागते ‘ असा अभिप्राय त्यांनी दिला. एक सेवा निवृत्त नागरिक म्हणाले, पूर्वी रस्त्यावरून मोठी गाडी गेली पार घरात धुरळा यायचा आता नवीन रस्ता झाल्या पासून धुळ नाही त्यामुळे आरोग्यदायी वाटतं आहे अशी प्रतिक्रिया दिली. एक ठिकाणी नालीच्या कडेनी बराच जागा सुटलेला होता, तिथे महानगरपालिकेला फेव्हरब्लॉक लावायला सूचना दिल्या. तसेच जागोजागी रस्त्याच्या नावाचे फलक लावून रस्त्यावर पांढऱ्या पट्या मारण्याच्या सूचना दिल्या .
