जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कापूस शेतीमध्ये राबणाऱ्या महिलांच्या आरोग्य आणि पोषणाचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस‘ हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युनिसेफ, जिल्हा परिषद, कृषी विज्ञान केंद्र आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेतंर्गत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरीत्या संपन्न झाले.
९ तालुक्यांवर विशेष लक्ष
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत राबविल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, अमळनेर, पारोळा, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव आणि चोपडा या प्रमुख कापूस उत्पादक तालुक्यांचा समावेश आहे.
रसायनांपासून संरक्षण आणि पोषण सुधारणेचा उद्देश
कापूस शेतीमध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत कीटकनाशकांचा मोठा वापर होतो. या रसायनांशी थेट संपर्क आल्यामुळे गर्भवती महिला, स्तनदा माता आणि त्यांच्या बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यासोबतच: वाढत्या तापमानाचा आरोग्यावरील परिणाम. कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ उभे राहणे व जड ओझे वाहणे. व्यस्त दिनचर्येमुळे पोषणाकडे होणारे दुर्लक्ष. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी महिलांना सुरक्षित शेती पद्धती आणि संतुलित आहाराबाबत जागरूक करणे हे ‘वात्सल्य प्लस‘चे मुख्य ध्येय आहे.
१५९ कृषी सखींनी घेतले प्रशिक्षण
उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी २० ते २३ एप्रिल २०२६ या काळात प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. अमळनेर, धरणगाव आणि कृषी विज्ञान केंद्र (जळगाव) येथे झालेल्या या सत्रात १५९ कृषी सखी, ८ आशा गटप्रवर्तक, २९ प्रभाग समन्वयक आणि ५ कृषी सहाय्यक सहभागी झाले होते. या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत आता गावागावांत जनजागृती केली जाणार आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशासकीय समन्वय
या प्रशिक्षणात डॉ. वैभव सूर्यवंशी, डॉ. बी. डी. जडे, डॉ. प्रदीप लासुरकर, डॉ. गोपाळ पंडगे यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कीटकनाशकांचा सुरक्षित वापर, वैयक्तिक संरक्षण साधने आणि हवामान बदलानुसार किडींचे व्यवस्थापन यावर तांत्रिक माहिती देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि कृषी विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राबवला जात असून, यातून ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरक्षित आणि सशक्त शेती वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
