Headlines
Home » क्रीडा » JCL-2026 : उद्या रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’ बाईक

JCL-2026 : उद्या रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’ बाईक

जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) चा महासंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर उद्या, रविवार दि. २६ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजता स्पर्धेची ‘ग्रॅण्ड फायनल’ रंगणार आहे. या अंतिम लढतीनंतर विजेत्यांवर पारितोषिकांचा वर्षाव केला जाणार आहे.

विजेत्यांना २ लाख आणि ट्रॉफी

स्पर्धेतील विजेता संघ २ लाख रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफीचा मानकरी ठरेल, तर उपविजेत्या संघाला १ लाख रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल. याव्यतिरिक्त तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांसह फेअर प्ले, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सर्वाधिक षटकार, निर्धाव चेंडू आणि सर्वोत्कृष्ट झेल अशा विविध श्रेणीत वैयक्तिक पुरस्कार दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ‘प्लेयर ऑफ द लीग’ला (मालिकावीर) पगारिया ऑटो तर्फे ‘पल्सर’ बाईक बक्षीस दिली जाणार आहे.

इन्सेंटिव्ह रकमेचा अभिनव उपक्रम

अध्यक्ष अतुल जैन यांच्या संकल्पनेतून स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव कोगटा किंग्ज, रावेर रॉयल्स, जामनेर सातपुडा हिरोज, अमळनेर सुहांस जायंट, पाचोरा एसकेटी योद्धाज आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स या सहाही संघांना त्यांच्या कामगिरीनुसार ‘इन्सेंटिव्ह’ रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक संघाला प्रोत्साहन मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

अटीतटीच्या सामन्यात जामनेरचा विजय

आज झालेल्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात जामनेर सातपुडा हिरोजने चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सवर अवघ्या २ धावांनी निसटता पण थरारक विजय मिळवला. जामनेरने प्रथम फलंदाजी करताना राम राठोडच्या नाबाद ३४ धावांच्या जोरावर ८ बाद १५० धावा केल्या.

चाळीसगावचा लढा

प्रत्युत्तरात चाळीसगावच्या ओम मुंडेने ६० चेंडूत नाबाद ८३ धावांची झुंजार खेळी केली, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्यांचा संघ १४८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह जामनेरने क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला असून, त्यांची लढत जळगाव कोगटा किंग्जशी होणार आहे. यातून विजयी होणारा संघ उद्या फायनलमध्ये धडक देईल.

मान्यवरांची उपस्थिती

रविवारी होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, मयंक पारिख (मुंबई) यांच्यासह सर्व संघ मालक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!