राजकोट, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )- राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जैस्वालने १२२ चेंडूचा सामना करत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. मात्र पाठीच्या दुखण्याच्या त्रास सुरु झाल्याने त्याला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. तत्पूर्वी त्याने शुबमन गिलबरोबर १९५ चेंडूत १५५ धावांची भागीदारी साकारली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ५१ षटकानंतर २ बाद १९६ धावा केल्या असून ३२२ धावांची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा १९ धावा करून बाद झाला, तेव्हा दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या ३० धावा होती. यशस्वीने मैदान सोडल्यानंतर रजत पाटीदार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र, त्याला साधा भोपळही फोडता आला नाही. त्यामुळे त्याच्या धावांची पाटी कोरी राहिली. सध्या कुलदीप यादव तीन धावांवर नाबाद असून शुबमन गिल ६५ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून जो रूट आणि टॉम हार्टले यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
टीम इंडियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला होता. आज सकाळी भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून दूर ठेवले. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाला दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने २ बाद १९६ धावां केल्या असुन भारताची एकूण आघाडी आतापर्यंत ३२२ धावांची झाली आहे, उद्या भारतीय फलंदाजांचे सर्वात पहिले लक्ष ४०० पार असेल . त्यानंतर मात्र फलंदाजांकडून जोरदार खेळाची अपेक्षा असेल .
