Home » राष्ट्रीय » ‘यूपीए’ सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली – पंतप्रधान मोदी ;

‘यूपीए’ सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली – पंतप्रधान मोदी ;

नवी दिल्ली,दि.१७( वास्तव पोस्ट न्यूज )– पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना, हरियाणामधील रेवाडी येथील जाहीर कार्यक्रमात, काँग्रेसप्रणित ‘यूपीए’ सरकारवर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप मोदींनी केला. ‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवत आहे’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंजाब व हरियाणातील शेतकरी किमान आधारभूत किमती संदर्भात कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करत असून त्यासंदर्भात मोदींनी जाहीरपणे प्रत्यक्ष कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र, हरियाणातील कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अप्रत्यक्ष दखल घेतली. केंद्र सरकारने छोटय़ा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी किसान सन्मान निधीसारख्या योजना राबवल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

हमीभावाच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालू राहील, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. आंदोलक शेतकरी नेते व तीन केंद्रीय मंत्री यांच्यामध्ये गुरुवारी पाच तास झालेली चर्चाही निष्फळ ठरली. दरम्यान, शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून शुक्रवारीही आंदोलनांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर अश्रुधुरांचा मारा केला. पोलिसांच्या कारवाईला न जुमानता शेतकऱ्यांचा ठिय्या कायम आहे. शंभू सीमा तसेच, हरियाणातील विविध ठिकाणी तसेच दिल्लीच्या वेशींवरही पोलीस व निमलष्करी दलांचा कडेकोट बंदोबस्त असून राजधानी परिक्षेत्रामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!