नवी दिल्ली l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
पश्चिम आशियातील (इराण-इस्रायल-यूएस) युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे परिणाम भारतातही जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २२ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा आढावा घेतला.
गॅस आणि इंधनाचे संकट:
२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून सरकारने पेट्रोलचे दर स्थिर ठेवले असले, तरी ‘प्रीमियम तेला’च्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ झाली आहे. भारताचा २०% गॅस पुरवठा ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’तून होतो, जो सध्या इराणने रोखला आहे. यामुळे अनेक शहरांमधील सीएनजी स्टेशन्स आणि गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. टँकर्स अडकून पडल्यामुळे एलपीजीच्या वापरातही घट झाली आहे.

राजनैतिक हालचाली:
पंतप्रधान मोदींनी कालच इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा करून सागरी मार्गांच्या सुरक्षेची आणि भारताला होणाऱ्या अखंड पुरवठ्याची खात्री घेतली. यापूर्वी इराणने दोन भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग दिला होता, ही दिलासादायक बाब आहे. या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी आखाती प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध केला. अशा कृतींमुळे प्रादेशिक स्थिरतेला मोठा धोका निर्माण होतो आणि जागतिक पुरवठा साखळ्यांवर परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांनी प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि मुक्त व्यापारावर भर दिला.

अखंड पुरवठ्याचे निर्देश:
पंतप्रधानांनी पेट्रोलियम, वीज आणि खत क्षेत्रातील पुरवठा साखळी मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. साठेबाजी रोखून सर्वसामान्यांपर्यंत अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. सरकारी सूत्रांनुसार, पंतप्रधान मोदींपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अधिकाऱ्यांना देशातील अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित राहील, याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा कायम ठेवण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
बैठकीला यांची होती उपस्थिती:
अमित शाह (गृह), राजनाथ सिंह (संरक्षण), एस. जयशंकर (परराष्ट्र), निर्मला सीतारमण (अर्थ), हरदीप सिंह पुरी (पेट्रोलियम), मनोहर लाल खट्टर (ऊर्जा), पीयूष गोयल (वाणिज्य), शिवराज सिंह चौहान (कृषी), अश्विनी वैष्णव (रेल्वे), जे. पी. नड्डा (आरोग्य) आणि एनएसए अजित डोवाल यांची उपस्थिती होती.

