मुंबई, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुंबईतील ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’चा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
यामध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी यांना डायनॅमिक बिझिनेस महिला या क्षेत्रातील पुरस्कार, अभिनेता रणबीर कपूर यांना विशेष पुरस्कार तसेच राज्याचे ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना पॉवर पॉलिटिक्स म्हणून विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सर्वांचे यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्यानंतर या सोहळ्यात लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. अवघड प्रश्नांची गुगली आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी लगावलेल्या षटकारांनी ही मुलाखत रंगली. याच मुलाखतीत फडणवीस यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. मात्र उद्धव ठाकरे आणि आमची पुन्हा युती होण्याची शक्यता नसल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे.
