गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी निमित्त मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, यावेळी मंचावर (डावीकडून) सुरेश शेट्टी, हरजितसिंग बवरी, सुरेंद्र सिंग जोहरी, रवींद्र सिंग जोहरी
वास्तव पोस्ट l जळगाव : एस.एस. मणियार विधी महाविद्यालय येथे ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त पथनाट्य व पोस्टर सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लॉ बुक हाऊसचे संचालक सुरेश शेट्टी तसेच जळगाव गुरुद्वाराचे अध्यक्ष हरजीतसिंग बवरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी तर मंचावर सुरेंद्र सिंग जोहरी, रवींद्र सिंग जोहरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अंजली बोंदर, डॉ. डी.आर. क्षीरसागर, प्रा. जी.व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, प्रा. शरद चव्हाण, प्रा. बी.एस. पाटील, प्रा. नितीन मटकरी व प्रा. स्वाती लोखंडे हेही उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे हरजीतसिंग बवरी यांनी गुरु तेग बहादूर यांच्या अद्वितीय त्याग, धैर्य आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या पराक्रमामुळेच त्यांना ‘तेग बहादूर’ हे बिरुद प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये व सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यांमधून सामाजिक न्यायाचा प्रभावी संदेश देण्यात आला, तर पोस्टर सादरीकरणाद्वारे भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी ईशा पिंपळीकर यांनी केले. शेवटी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अंजली बोंदर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

