जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरापासून ते ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयांपर्यंत गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे नरेंद्र सपकाळे यांची माहिती अधिकार संघर्ष समिती तथा जनजागृती समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने जळगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
घरकुल, शासकीय योजना, लाभार्थी हक्क, प्रशासनातील दिरंगाई व भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत सपकाळे यांनी आजवर अनेक गोरगरीब कुटुंबांना न्याय मिळवून दिला आहे. “मी नाही बोलत, माझा गरिबांचा आशीर्वाद बोलतो” असे ठामपणे सांगत, जिथे अन्याय होतो तिथे निर्भयपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.

“माझी लढाई कोणत्याही अधिकाऱ्याशी नाही, तर भ्रष्ट व्यवस्थेतील कीड लागलेल्या प्रवृत्तींशी आहे” असे स्पष्ट मत मांडत, गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन, लाक्षणिक उपोषण तसेच आमरण उपोषणासारखी कठोर पावले उचलण्याचे धैर्य त्यांनी दाखवले आहे.
त्यांच्या या समाजहिताच्या कार्याची दखल घेत माहिती अधिकार संघर्ष समितीने त्यांची जळगाव तालुकाध्यक्षपदी निवड केली. या निवडीचे स्वागत करत जळगाव शहरासह ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते व नागरिकांकडून नरेंद्र सपकाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ही निवड म्हणजे केवळ एका पदाची जबाबदारी नव्हे, तर अन्यायाविरोधातील संघर्षाला मिळालेले नवे बळ असून, आगामी काळात तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावी लढा उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

